ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुलाची मोफत रेती शासनाकडूनच गायब!

नवेगाव वाघाडे येथील लाभार्थ्यांची उघड लूट ; अधिकारी–ट्रॅक्टरधारक संगनमताचा संशय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यात पंतप्रधान, शबरी व रमाई आवास योजनेअंतर्गत हजारो गोरगरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू असतानाच, गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंबी गट ग्रामपंचायतीतील नवेगाव वाघाडे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरकुल लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या ५ ब्रास रेतीवरच डल्ला मारण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोंडपिपरी तालुका आदिवासी बहुल,मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो.९८ गावे समाविष्ट असलेल्या या तालुक्यातील अनेक कुटुंबांना पक्का निवारा नाही, हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे घर बांधणे गोर गरिबांसाठी स्वप्नच असत. हक्काचा निवारा मिळावा यासाठी घरकुल योजने अंतर्गत अनेक कुटुंब अर्ज सादर करतात. हातावर मोजण्या इतके नागरिकांना घरकुलाचे मंजुरी मिळते. डोळ्यात स्वप्न ठेवून बांधकामास सुरूवात करण्यापूर्वी रेती, विट, यासह इतर साहित्याची जुळवा करीत असतांनाच अचानक रेती वाटप प्रक्रियेत घोळ झाल्याने रेती अभावी घरकुल बांधायचं कसे असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.

नियमाप्रमाणे पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांची ऑनलाइन यादी तयार करून तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर केली जातात. त्यानंतर ट्रान्झिट पास (टी.पी.) देऊन अधिकृत घाटावरून रेती वाटप करण्याची प्रक्रिया आहे. मात्र प्रत्यक्षात काही ट्रॅक्टरधारकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाभार्थ्यांच्या नावावरची रेती दुसरीकडे वळविल्याचा आरोप होत आहे.

या प्रकाराचा फटका थेट गरीब कुटुंबांना बसत असून, अनेकांचे घरकुल बांधकाम रेतीअभावी ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे, लाभार्थी तहसील कार्यालयात रेतीसाठी गेले असता “तुमच्या नावावरची रेती आधीच उचल करण्यात आली आहे” असे सांगून त्यांना परत पाठवण्यात येत आहे. शासन दप्तरी देखील तशी नोंद असल्याचे दाखवले जात असल्याने हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे.

या प्रकरणामुळे केवळ भ्रष्टाचाराचा संशयच नाही, तर संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रेती वाटपावेळी संबंधित तलाठी, पोलीस पाटील उपस्थित होते का? ट्रॅक्टर क्रमांक व मालकांची पडताळणी झाली का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी चौकशीची मागणी जोर धरली असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

   “घरकुलासाठी पाच ब्रास रेती मिळणार असल्याने तहसील कार्यालयात रेती मागणी साठी गेलो असता आमच्या वाट्याची रेती पूर्वीच उचल केली असल्याची शासकीय दप्तरी नोंद असल्याचे सांगण्यात आले.हे एकूण धक्का बसला आहे.आम्ही रेती नेलीच नाही . रेती अभावी घर बांधायचे कसे गहन प्रश्न उभा टाकला आहे”

— शशिकला सरवर, घरकुल लाभार्थी, नवेगाव वाघाडे 

“याबाबतची माहिती आता मिळाली आहे. संबधीताकडून माहिती घेऊन सांगते.”

— लघीमा तिवारी, उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी 

“रेती वाटप करतांना तलाठीच्या समक्ष ज्या घाटाचा (टिपी) ट्रान्सफोर्ट परवाना दिला आहे,त्या घाटावर लाभार्थी स्वतः हजर राहून त्याची शासकीय बुक रेकॉर्ड दप्तरी नोंद करून,स्वाक्षरी घेऊनच रेती वाटपाच्या सूचना दिल्या. मात्र असा प्रकार घडत असेल तर लाभार्थ्यांनी तक्रार द्यावी. चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करू.”

       — शुभम बहाकर, तहसीलदार, गोंडपिपरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये