ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुधवाहीत ‘डायरिया’चा उद्रेक; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे २६ नागरिक बाधित

पावसाळा सुरू होऊनही आरओ (RO) प्लांट बंद; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकायचाही विसर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या दुधवाही गावात सध्या दूषित पाण्यामुळे डायरिया (हागवण व उलट्या) या आजाराने गंभीर रूप धारण केले आहे. पावसाळा सुरू होऊनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि बेफिकिरीमुळे गावात साथीचे आजार पसरल्याचा संतप्त आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत २६ जणांना लागण झाली असून, एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पैसे देऊन पाणी विकत घेणारा ‘आरओ’ (RO) प्रकल्प बसवण्यात आला आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात, जेव्हा दूषित पाण्याचा धोका सर्वाधिक असतो, तेव्हाच हा प्रकल्प बंद अवस्थेत आहे. याशिवाय, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर प्रतिबंध म्हणून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत नियमित ‘ब्लिचिंग पावडर’ टाकणे हे ग्रामपंचायतीचे प्राथमिक कर्तव्य असते. परंतु, पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी ग्रामपंचायतीने अद्याप टाकीत ब्लिचिंग पावडर टाकलीच नाही. ग्रामपंचायतीच्या याच अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा न झाल्यामुळे दुधवाहीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गावात २५ जुलै रोजी डायरियाचे दोन ते तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर अवघ्या दोन – तीन दिवसांत ही संख्या वाढली. आतापर्यंत दूधवाहीत २६ रुग्णांची नोंद झाली असून सध्या ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, २८ जुलै रोजी दुधवाही येथील एका ३५ वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाला. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर महिला मतिमंद असल्यामुळे तिने औषधी घेतली नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर महिलेचा मृत्यू नेमका डायरियानेच झाला की अन्य कारणाने, याबाबत अद्याप विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, याची नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सदर महिलेलाही डायरियाचीच लागण झाली होती, हे मात्र विशेष.

गावात डायरियाचा उद्रेक झाल्याचे समजताच दिनांक २८ जुलै२०२६ ला आरोग्य विभागाचे पथक तातडीने दुधवाही येथे दाखल झाले असून, त्यांनी गावात तळ ठोकला आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरू आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात २५ जुलै रोजी डायरियाचे दोन ते तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर अवघ्या दोन – तीन दिवसांत ही संख्या वाढली. परंतु, डायरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन सुद्धा आशा वर्कर त्यांनी आरोग्य यंत्रणेला उशीरा कळविले. आशा वर्कर यांनी वेळीच माहिती दिली असती तर, २५ जुलैपासूनच गावात कॅम्प लावला असता. आरोग्य विभागाकडून सध्या गावात आरोग्यविषयक योग्य माहिती देऊन व्यापक जनजागृती केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही क्लोरिनेशन केले असून रुग्णांना औषधोपचाराचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असून, सध्या गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी दूधवाही येथील ग्रामपंचायत सचिव यांना कॉल केले असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आरोग्य विभाग आता उपाययोजना करत असला, तरी “प्रशासकीय निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर आणि पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल दुधवाहीतील नागरिक विचारत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये