शिष्यवृत्ती परीक्षेत पालडोह जिल्हा परिषद शाळेची सुवर्णकामगिरी
शिष्यवृत्ती परीक्षेत १६ विद्यार्थी पात्र

चांदा ब्लास्ट
जिवती :- अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखली जाणारी जिल्हा परिषद हायस्कूल पालडोह या ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेने यंदाही आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे तब्बल १६ विद्यार्थी पात्र ठरले असून, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
जिवती तालुक्यातील आकांक्षित व अतिदुर्गम आदिवासी भागात कार्यरत असलेल्या या आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये देवांश परतेकी, अमन शेख, नंदिनी कुंडगीर, रेखा माने, निखिल गुर्जेवाड, इमरान शेख, शिवण्या कांबळे, प्रिया पवार, आरुषी तत्तापुरे, तिरुपती माने, श्रद्धा कुंडगीर, वैभव गीते, आकिब शेख, अभिषेक पवार, प्रगती सलगर आणि वैभव केजगीर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशामागे शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी स्वतःच्या मुलालाही याच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण देत सरकारी शाळांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह समाजातही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शाळेच्या गुणवत्तेमुळेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश मिळविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पालडोह शाळेचा समावेश झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप चौधरी, विस्तार अधिकारी रामगिरकर, केंद्रप्रमुख मोरे, नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक प्रशांत दिगदेवतुलवर, राजेंद्र परतेकी, वर्गशिक्षक सतीश गाकरे, विनोद खवशी, मार्गदर्शक सुनील आडे, निकिता इंझळकर, प्रशांत कोटनाके, शिक्षणप्रेमी गणपत धुळगुंडे, शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व नोटबुक देऊन सत्कार केला.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेतही या शाळेने प्रथमच सहभाग नोंदवत १०० टक्के निकाल लावला होता. एकूण १४ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे पालडोह जिल्हा परिषद शाळा सातत्याने गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण करत असून, संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.



