स्मार्ट मीटरच्या नावाने सर्वसामान्यांची लूट थांबवा!
ब्रह्मपुरीत भाकपचा एल्गार; महावितरण कार्यालयासमोर धडक निदर्शने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : जनतेवर लादण्यात येत असलेल्या तथाकथित ‘स्मार्ट’ मीटरच्या कारभाराविरोधात आणि सतत होणाऱ्या वीज दरवाढीच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या क्रोधाचा बुधवारी महावितरण कार्यालयासमोर स्फोट झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने काँ. विनोद झोडगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली शेकडो संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार धरणे आंदोलन केले._
महावितरण कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन करीत महावितरणच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध केला. स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा लादला जात असून, वीज ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ब्रह्मपुरी शहरासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबवावे, यापूर्वी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून त्याठिकाणी जुने सामान्य मीटर बसवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. नवीन वीज जोडणी घेताना ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, घरगुती ग्राहक तसेच शेतकऱ्यांना सामान्य मीटरद्वारे अखंडित वीजपुरवठा करावा आणि अवाजवी व सातत्याने होणारी वीज दरवाढ रद्द करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनानंतर कॉ. विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता भारतभूषण औगडे यांची भेट घेत मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉ. झोडगे यांनी यावेळी दिला.
हे निवेदन केवळ स्थानिक पातळीवर न ठेवता राज्यपाल, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तसेच अधीक्षक अभियंता, चंद्रपूर यांनाही पाठविण्यात येणार असल्याचे भाकपच्या वतीने सांगण्यात आले. मोर्चाला भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार आणि एकलव्य सेनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद भनारे, सामाजिक कार्यकर्ते अँड आशिष गोंडाने यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. विनोद झोडगे, जिल्हा सहसचिव, भाकप यांनी केले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी राकेश धानोरकर, सत्यपाल डोंबळे, पितांबर मस्के, शरद भानारकर, राहुल पांडव, उसन ठाकरे, तानबा कोटगले, अमोल मानापुरे, सुधीर खेवले, मनोहर मंडपे, महेंद्र सोंडवले, गोलू दर्वे ,अनिल हनवते, स्वप्नील राऊत,गणेश बगमारे, जगदीश टाक , आकाश खंडाळकर यांच्यासह भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीच्या प्रश्नावर ब्रह्मपुरीत झालेल्या या आंदोलनामुळे महावितरणच्या धोरणांविरोधातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, शासन व प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



