श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रसंत साहित्यावर परिसंवाद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सुभाष मार्गावर असलेल्या श्रीगुरुदेव सेवाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि ग्रामजयंती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रसंत साहित्याच्या अनुरूप विशेष परिसंवादाचे आयोजन मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले होते. प्रमुख वक्ते म्हणून बौद्ध धम्म अभ्यासक अशोक सरस्वती, ज्येष्ठ लेखक सुरेंद्र बुराडे उपस्थित होते तर श्रीगुरुदेव सेविका सौ. संगीता जावळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर परिसंवादाचे प्रास्ताविक राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे सदस्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
धार्मिक एकता आणि राष्ट्रसंत या विषयांवर सुप्रसिद्ध सामाजिक वक्ते अशोक सरस्वती यांनी राष्ट्रसंताना अपेक्षित असलेला विश्वधर्म आणि विश्वमानव यावर प्रकाश टाकून राष्ट्रसंतानी केलेले राष्ट्रोद्धाराचे सामाजिक आणि धार्मिक कार्य पाहता, राष्ट्रसंत हे देशातील शेवटचे धर्मसुधारक ठरतात असे प्रतिपादन अशोक सरस्वती यांनी केले.
श्रद्धा , अंधश्रद्धा आणि सद्वविवेक या विषयावरील पुष्प सुरेंद्र बुराडे यांनी गुंफले. राष्ट्रसंतांनी अंधदुबळ्या भाविकपणावर प्रहार करत डोळस विवेकवादी विचारांचा सदोदित पुरस्कार केल्याचे ते म्हणाले. एड. अशोक यावले यांनी संविधान आणि ग्रामगीता या विषयावर मार्गदर्शन करतांना दोन्ही ग्रंथातील मौलिक ज्ञान , प्रासंगिकता सांगत देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी दोन्ही ग्रंथांची असलेली महत्त्वाची भूमिका यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
सूत्रसंचालन सेवाश्रमाचे सहसचिव श्री.राजेश कुंभलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप सुरकार गुरूजी यांनी केले. कार्यक्रमास सेवाश्रमाचे प्रचार प्रमुख सियाराम चावके, सचिव विठ्ठलराव पुनसे, रामराव चोपडे, इंजि. विलास उगे, डॉ. श्रावण बानासुरे आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात वंदनीय राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे पूजन करून या सत्रात एड. अशोक यावले यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची कर्तव्ये व आजचे आव्हान या विषयांवर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास श्री गुरुदेव सेवा मंडळाची उपासक, कार्यकर्ता मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



