भद्रावतीत एमडी ड्रग्जसह विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात., ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे
भद्रावती :- पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर व एक मोबाईल असा एकूण ₹३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी रात्री १० ते ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहरात एक मुलगा एम.डी. ड्रग्ज पावडर विक्रीसाठी बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष छापा टाकून संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाची झडती घेण्यात आली.
या कारवाईत त्याच्याकडून ५.११ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पावडर (किंमत सुमारे ₹१२,०००) तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (किंमत ₹२०,०००) जप्त करण्यात आला. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रवर कानतके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बालक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृंदा केदारे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदारे व भद्रावती पोलीस ठाण्यातील पथकाने केली



