मोफत चित्रकला, योग आणि स्पोकन इंग्लिशमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा
स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा संचालित लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, कॉलरी वॉर्ड येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत चित्रकला, योगाभ्यास आणि स्पोकन इंग्लिश वर्गांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१ जुलैपासून या अभ्यास केंद्रात झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक रविवारी प्रसिद्ध कला शिक्षक सुजित वाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला वर्ग भरत असून विद्यार्थ्यांना रेखाटन, रंगसंगती, कल्पनाशक्तीचा विकास आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुजित वाटकर यांनी कला ही केवळ छंद नसून ती उपजीविकेचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत एखादी कला आत्मसात केल्यास कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर उभे राहता येते. त्यामुळेच “कला माणसाला उपाशी मरू देत नाही,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी त्यांनी जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या संघर्षमय प्रवासाचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. चित्रपटांची पोस्टर्स रंगविण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंत पोहोचला. आजही चित्रकला, स्केचिंग, डिजिटल डिझाइन यांसारख्या क्षेत्रांत अनेक युवक यशस्वी करिअर घडवत असल्याने अभ्यासासोबत एखादी कला अवश्य आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अभ्यास केंद्रात सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता योग शिक्षिका शितल मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत योगाभ्यास वर्ग घेतला जातो. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत गोपाळ गुडधे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोकन इंग्लिशचे नियमित वर्ग भरतात. तर प्रत्येक रविवारी चित्रकला वर्गातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळत आहे. योग, स्पोकन इंग्लिश आणि चित्रकला या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि कलागुण विकसित करण्याचा अभ्यास केंद्राचा प्रयत्न असून, झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम वरोरा परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.



