डॉ. अनिरुद्ध वनकर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष
बोरगावच्या भूमिपुत्राकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर जिल्ह्यातील बोरगाव या गावचे भूमिपुत्र, प्रसिद्ध नाट्य निर्माता, लेखक, दिग्दर्शक, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, प्रबोधनकार डॉ. अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती च्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी यासाठी संसदेत आवाज उठवीला. देशातील अनुसूचित जाती, जमाती व मागासवग्रीयांना नेतृत्वाची संधी मिळायला हवी यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. सोबतच काँग्रेस ला सर्वसमावेशक बनविण्यासाठी पक्षाने भूमिका तयार केली आहे. याच माध्यमातून आता डॉ. अनिरुद्ध वनकर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
डॉ. अनिरुद्ध वनकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील भूमिपुत्र आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बोरगावात झाले. गोंडपिपरी येथील जनता शाळेतही त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते चंद्रपुरात स्थिरावले. सुरवातीच्या काळात त्यांनी गावागावात पथनाट्य, कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. पुढे दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून कलेचे उच्च शिक्षण घेतले.
मग झाडीपट्टीतील या उमद्या कलावंताने मागे वळून पाहिले नाही. नाट्य निर्माता, दिग्दर्शक, लेखक, स्वतः प्रबोधनकार, कलावंत अशा विविध भूमिका साकारीत महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम केलेत. दरम्यानच्या काळात त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. लक्षनीय मत घेतले. पण त्यांना यश मिळाले नाही.
सध्या काँग्रेस पक्ष बॅकफुट वर आहे. अशात समाजातील अनेक घटकांना नेतृत्वाची संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून अनिरुद्ध वनकर यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
*आमदारकीची मोठी संधी हुकली*
मागील काळात अनिरुद्ध वनकर यांचे नाव काँग्रेस कडून विधापरिषदेसाठी निश्चित करण्यात आले होते. पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तो प्रस्ताव रोखून धरला होता. यामुळे अनिरुद्ध वनकर यांच्या समवेत अनेकांची मोठी संधी हुकली.
या बाबत तेव्हा अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता.



