ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्या समन्वयातून कौशल्यधिष्ठित शिक्षण मिळणार _ कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शैक्षणिक संस्थां आणि उद्योग संबंध हा सध्याच्या बदलत्या युगात कौशल्यधिष्ठित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा

आहे.विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक ज्ञान निर्माण करणे आणि उद्योगजगताच्या गरजेनुसार मनुष्यबळ तयार करण्याचे मोठे काम या संकल्पनेतून होणार असल्याचे प्रतिपादन गोंडवांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले.

याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपरवाही (गडचांदूर) येथे इंडस्ट्री – अकॅडमीया संबंधावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी या चर्चासत्रात गोंडवाना विद्यापीठाच्या नवोउपक्रम व नव संशोधन विभागाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे,प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह, अंबुजा चे व्यवस्थापक श्री सोनी, माणिकगड सिमेंटचे श्री शंतनु, अंबुजाचे एचआर हेड श्रीकांत कुंभारे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

        कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये पदवीनंतर लगेच नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध होईल यासाठी अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य शिक्षण अंतर्भूत करणे काळाची गरज आहे. करीता गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला असून सर्व शाखेमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम आणण्याचा मानस विद्यापीठाचा आहे. गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि उद्योग यांचा योग्य रीतीने समन्वय साधल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

          याप्रसंगी संचालक डॉ. मनीष उत्तरवार यांनी इंडस्ट्री-अकॅडमीया या संकल्पनेची रूपरेषा सादरीकरणाच्या माध्यमातून अतिशय यशस्वीपणे सादर केली. यावेळी अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल व कौशल्य शिक्षण अभ्यासक्रमाबद्दल महत्त्वाची माहिती विशद केली. या चर्चासत्रात प्रास्ताविकातून डॉ. संजय गोरे यांनी इंडस्ट्री- अकॅमेडीया या संकल्पनेची मांडणी केली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले.

     या प्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचा अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तर नागपूर विभागात अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला उत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्याबाबत गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्राचार्य प्रमोद खडसे यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य संभाजी वाडकर, प्राचार्य देव, प्राचार्य शक्य मॅडम, प्राचार्य गजानन राऊत तसेच गडचांदूर, कोरपणा, जिवती, राजुरा, देवाडा या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि शिक्षक तसेच या परिसरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक गण प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबुजा प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये