ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामाळा तलावातील माशांचा मृत्यू म्हणजे ३० कोटींच्या निधीचा बळी

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा खासदार प्रतिभा धानोरकरांचा इशारा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक भूषण असलेल्या रामाळा तलावात सध्या हजारो माशांचा जो सामूहिक मृत्यू झाला आहे, तो केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय यंत्रणेचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही तलावाची ही भीषण दुर्दशा होणे अत्यंत क्लेशदायक आहे. माशांचा तडफडून झालेला मृत्यू आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे प्रशासकीय दाव्यांचे पूर्णतः वाभाडे निघाले असून, या घटनेमुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाला मोठा तडा गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पांतर्गत सावरकर नगर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम ९०% आणि संरक्षक भिंतीचे काम ८०% पूर्ण झाल्याचे प्रशासन सांगत असले, तरी प्रत्यक्षात तलावात दूषित पाणी मिसळणे अद्याप सुरूच आहे. तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी ‘ऑक्सिडेशन’ आणि ‘वायुवीजन’ यंत्रणा केवळ कागदोपत्रीच राबवली जात असल्याचा दाट संशय खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर प्राणवायूच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा बळी गेला असून, या तांत्रिक विसंगतीची आणि निधीच्या वापराची सखोल चौकशी होणे आता अनिवार्य झाले आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

तलावातील कचरा आणि जलपर्णी साफ करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध असतानाही रामाळा तलावाची ही स्थिती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. १८ मे २०२४ पासून सुरू झालेल्या या कामाची मुदत संपत आली असतानाही प्रकल्प पूर्णत्वाऐजी जलचरांच्या विनाशाकडे झुकत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ३० कोटी रुपये खर्च होऊनही जर तलाव प्रदूषणमुक्त होत नसेल, तर या अवाढव्य निधीचा विनियोग नेमका कुठे झाला? हा एक गंभीर प्रश्न असून या संपूर्ण प्रकरणाचे ‘न्यायवैद्यक अंकेक्षण’ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तलावातील मृत मासे युद्धपातळीवर काढून परिसराचे तात्काळ निर्जंतुकीकरण करावे आणि या विनाशाला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. जर प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींना पाठीशी घातल्यास, चंद्रपूरच्या जनतेला सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये