ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना जैन समाजापर्यंत पोहोचवा – अध्यक्ष ललित गांधी

जैन अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा

चांदा ब्लास्ट

 जैन मंदीरांना तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना जैन समाजातील नागरिक, युवक, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.गांधी यांनी जैन अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री.सोमण यांनी सादरीकरणाद्वारे विविध विभागाच्यावतीने जैन बांधवांना देण्यात येत असलेला लाभ व योजनांची माहिती दिली.

जैन समाज शासकीय योजनांच्या लाभापासून कायम वंचित राहिला आहे. समाजामध्ये जनजागृतीचा अभाव हे देखील यामागील एक कारण आहे. योजनांच्या लाभाचा समाजात बॅकलॅाग आहे. त्यामुळे या समाजात योजनांच्या जनजागृतीवर भर द्यावा. यासाठी समाजातील नागरिक व शासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. विविध योजनेच्या लाभासाठी समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज घेऊन त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा, असे श्री.गांधी म्हणाले.

जिल्ह्यात जुनी जैन मंदीरे आहेत. मंदीर विश्वस्तांनी या मंदीरांचे प्रस्ताव ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सादर करावे. येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले जावे. जुन्या जैन मंदीरांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. जैन अल्पसंख्याक शाळांना सुविधा देण्यासोबतच अशा काही शाळांचे प्रस्ताव असल्यास सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागास केल्या.

जैन समाजातील महिलांचा समावेश असलेले स्वयंसहायता बचतगट स्थापन करता येईल का? यादृष्टीने प्रयत्न व्हावे. जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समिती स्थापन करून त्यात अल्पसंख्याक सर्व सहा समाजातील नागरिकांचा समावेश करण्यात यावा आणि या समितीच्या नियमित बैठका घेतल्या जाव्या. जैन समाजातील युवकांना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ देण्यात यावा.

जैन साधुसंत पायदळ विहार करतात. त्यांना रस्त्यात कुठेतरी काही काळ विसावा घेता यावा यासाठी विहारधाम बांधण्याचे महामंडळाने ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात रस्त्यालगत चांगल्या जागा शोधा. शाळांच्या ठिकाणी जागा उपलब्ध होत असल्यास तेथे देखील विहारधाम बांधून देऊ. अन्यवेळी हे विहारधाम शाळांच्या उपयोगी पडेल. विहारधामसह जैन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी होस्टेलचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री.गांधी यांनी दिले.

बैठकीला जैन समाज बांधवांचे प्रतिनिधी तसेच जैन मंदीरांचे विश्वस्त उपस्थित होते. त्यांनी मांडलेले विषय यावेळी महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी समजून घेतले व आवश्यक सूचना केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये