मशरुम उद्योगाच्या माध्यमातून साधली आर्थिक प्रगती
चिंचाळा येथील स्नेहलता सावरकर यांची प्रेरणादायी यशोगाथा

अविनाश नागदेवे
वर्धा : स्वयंसहायता महिला गटाची चळवळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उभी राहिली आहे. हजारो महिलांना गटाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले. काही महिला उमेद, माविमच्या सहकार्याने उद्योजक, व्यावसायीक झाल्या आहे. मशरुम शेतीतून चिंचाळा येथील स्नेहलता मनोज सावरकर यांनी अशीच प्रेरणादायी यशोगाथा निर्माण केली आहे.
वर्धा तालुक्यातील चिंचाळा या गावातील रहिवासी असलेल्या स्नेहलता मनोज सावरकर या उन्नती लोकसंचालित साधन केंद्र, वर्धा अंतर्गत कार्यरत संबोधी स्वयं सहाय्यता महिला बचतगटाच्या सक्रिय व प्रगत सदस्य आहेत. त्यांनी ग्रामीण परिस्थितीतून पुढे येत मशरूम उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्याकडे सुमारे 2 एकर शेती आहे. या शेतीतून त्यांना मर्यादित उत्पन्न मिळत होते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवसाय शोधण्याचा निर्णय घेतला. लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथे मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आणि लहान प्रमाणात व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला कमी प्रमाणात मशरूम लागवड करतांना अनेक अडचणी आल्या. मात्र त्यांनी चिकाटी व कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायात सातत्य ठेवले. तेजस्विनी अंतर्गत त्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या माध्यमातून त्यांनी डार्क रूम, उत्पादन कक्ष उभारणी, बेड्स तयार करणे व मशरूम प्रक्रिया युनिट विकसित केले. यामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली व उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
आता त्या मशरूम उत्पादन व प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर चालवत आहेत. 2 हजार बेड्सवर मशरूम लागवड नियंत्रित वातावरणात उत्पादन प्रक्रिया उद्योगासह एकात्मिक व्यवसाय करत आहे. त्यांनी आपल्या मशरुम उत्पादनाचे मुल्यवर्धन केले. त्यातून त्या मशरुमची विविध उत्पादने घेतात. त्यात ताजे व वाळवलेले मशरूम, मशरूम पावडर, चटणी, मसाला मशरूम पापड, वडी, बिस्कीट, नानखटाई, लोणचे, मुरंबा, चटपटा पदार्थ, फेसपॅक व इतर पुरक उत्पादनांमध्ये गांडूळ खत व वर्मी वॉश मुल्यवर्धनामुळे उत्पादनाला अधिक किंमत व बाजारपेठ मिळाली आहे.
दोन हजार बेडवर 50 दिवसांत 3 वेळा उत्पादन घेतात. त्यात दररोज सुमारे 5 किलो उत्पादन होते. स्थानिक बाजारपेठ, किरकोळ विक्रेते, विक्री प्रदर्शनांच्या माध्यमातून त्या उत्पादने विकतात. ठिकठिकाणी त्यांच्य मशरुम उत्पादनांना चांगली मागणी आहे. कर्जाच्या योग्य वापरामुळे त्यांच्या उत्पादन व उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
मुल्यवर्धित उत्पादनामुळे नफा अधिक वाढला असून व्यवसाय स्थिर झाला आहे. त्यांनी आपल्या मशरुम निर्मिती उद्योगात सुमारे 12 ग्रामीण महिलांना रोजगार देऊन स्वावलंबी बनविण्यात योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कामामुळे त्यांनी विविध पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे.



