ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कन्हाळगाव अभयारण्यात भीषण वणव्याची धगधगती आग

शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

कन्हाळगाव अभयारण्याच्या झरन वनक्षेत्रात लागलेल्या भीषण वणव्यामुळे मोठी वनहानी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सलग दोन दिवस धगधगत राहिलेल्या या आगीने सुमारे २ किलोमीटरपर्यंतचा वनपट्टा जळून प्रभावित केला असून शेकडो हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, झुडपी जंगल व गवताळ भागात आग अचानक लागली आणि वाऱ्यामुळे ती वेगाने पसरत गेली. काही वेळातच संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले, त्यामुळे आसपासच्या भागात दृष्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.

झरण परिसरालगत तसेच कन्हाळगाव अभयारण्याच्या भागात आग झपाट्याने पसरल्याने वनसंपदा मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. कोरडे हवामान आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग नियंत्रणात आणण्यात वनविभाग व स्थानिक यंत्रणेला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

सलग दोन दिवस सुरू असलेल्या प्रयत्नांनंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आणणे कठीण ठरले. या वणव्यामुळे अनेक झाडाझुडपांचे नुकसान झाले असून वन्यजीवांच्या अधिवासावरही परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कन्हाळगाव अभयारण्य हे वन्यजीवांसाठी अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून येथे वाघांसह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यामुळे या भागात वणवा पसरल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

वनविभागाकडून नागरिकांना जंगल परिसरात अनावश्यक हालचाल टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून वणवा नेमका कशामुळे लागला याचा तपास सुरू आहे. तसेच परिसरात पुन्हा आग लागू नये, यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये