ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल सेवांमध्ये मोठा बदल; GPR अंतर्गत ‘युनिक फॉरमॅट’ लागू

राज्यभर एकसमान सेवा प्रणाली सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली असून शासन प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत नवी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या बदलामुळे राज्यातील महसूल सेवा आता अधिक सुलभ, पारदर्शक आणि एकसमान होणार आहेत.

या अंतर्गत आपले सरकार पोर्टलवर ‘युनिक फॉरमॅट’ प्रणाली महा आयटीमार्फत लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला हे बदल नागरिक लॉगिनमध्ये कार्यान्वित करण्यात आले असून सेवा केंद्र चालकांच्या लॉगिनमधील अर्ज प्रक्रियेतील सुधारणा लवकरच पूर्णपणे लागू होणार आहेत.

नवीन प्रणालीमध्ये अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. अर्जातील अनावश्यक फील्ड कमी करण्यात आले असून अर्जदाराचे नाव आता आधार क्रमांकाद्वारे स्वयंचलितरीत्या मिळवता येणार आहे. कागदपत्र अपलोड प्रक्रियेत बदल करून विभागाने निश्चित केलेल्या पर्यायांनुसारच कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जर कोणताही दस्तऐवज अनिवार्य म्हणून निश्चित असेल, तर त्या ठिकाणी फक्त तोच दस्तऐवज अपलोड करणे बंधनकारक राहील. अतिरिक्त दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच संबंधित प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचाच फोटो अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही सेवांमध्ये पूर्वीची बहुपर्यायी पद्धत बंद करून एकसंध अर्ज प्रणाली लागू करण्यात आली आहे.

या बदलांमुळे राज्यातील महसूल सेवांमध्ये एकसमानता, पारदर्शकता आणि वेग वाढणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया किंवा प्रमाणपत्र सेवांबाबत कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी संबंधित जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये