ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१ कोटी रुपयांच्या निधीतून चंद्रपूरात राणी हिराई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार — आ. किशोर जोरगेवार

राजमाता राणी हिराई महोत्सवात घोषणा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ गोंडवाना साम्राज्याच्या पराक्रमी शासक राजमाता राणी हिराई या चंद्रपूरचे वैभव असून, त्यांच्या गौरवशाली इतिहासासह आदिवासी संस्कृती हा संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. येणाऱ्या पिढ्यांना हा इतिहास कळावा यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीतून चंद्रपूरात राणी हिराई यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

चंद्रपूरचे वैभव असलेल्या राजमाता राणी हिराई यांच्या जयंतीनिमित्त कोहिनूर तलाव येथे ‘हिराई महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील आदिवासी समाजबांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय प्रतिनिधी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, राणी हिराई यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर सलग १५ वर्षे उत्कृष्ट राज्यकारभार केला. चंद्रपूर शहराला लाभलेली १७ किलोमीटर लांबीची भक्कम तटबंदी आणि महाकाली मंदिर हे त्यांच्या कार्याची साक्ष देतात.

राणी हिराई यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी शहरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्यांच्या शौर्यगाथा चित्रांच्या माध्यमातून जिवंत करण्यासाठी शहरात भव्य वॉल म्युरल तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यासोबतच, चंद्रपूरची ओळख असलेल्या ऐतिहासिक कोनेरी तलाव येथे राणी हिराई यांची जीवनगाथा आणि समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी अत्याधुनिक ‘लाईट अँड साऊंड शो’ सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, जगात मुघल सम्राटाने आपल्या बेगमच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला, मात्र हिंदुस्थानात एका पत्नीने आपल्या पती वीरशहा यांच्या स्मरणार्थ ‘मिनी ताजमहाल’ उभारल्याचे अद्वितीय उदाहरण म्हणजे राणी हिराई होय. चंद्रपूरवर राज्य करणाऱ्या २३ आदिवासी शासकांमध्ये त्या एकमेव महिला शासक होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी प्रजेच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

पुढील वर्षी हा जयंती महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, यासाठी पूर्वनियोजन करून जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना एकत्रित करण्यात येईल. चंद्रपूरचा गौरवशाली इतिहास राज्य व देशभर पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला आदिवासी बांधव आणि चंद्रपूरकर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये