नागपुरात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खनन अभियांत्रिकी शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, संशोधन व तंत्रज्ञान (RCERT), महाविद्यालयाच्या खनन अभियांत्रिकी शाखेच्या (Mining Engineering)माजी विद्यार्थ्यांचा नागपूर येथे आयोजित भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. खनन अभियांत्रिकी शाखेच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एकमेकांशी संवाद साधत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या सोहळ्याच्या अध्यक्षपदी व प्रमुख मान्यवर म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, माजी संचालक जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड (JSPL Limited) श्री. देवेंद्र व्यास, कोल इंडियाचे माजी कार्यकारी संचालक श्री. आलोक श्रीवास्तव, सेस्मा अध्यक्ष व एरिया जनरल मॅनेजर श्री. सभ्यसाची डे तसेच डायरेक्टर जनरल ऑफ माईन्स सेफ्टी (DGMS,वेस्टर्न झोन) श्री. आफताब अहमद यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
महाविद्यालयाच्या १९८३ साली झालेल्या स्थापनेपासून आजपर्यंत हजारो विद्यार्थी या संस्थेतून घडले असून अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत. विशेषतः कोल इंडियाच्या विविध उपकंपन्यांमध्ये अनेक माजी विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत राहून नेतृत्व करत आहेत, ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता नोंदणी प्रक्रियेद्वारे झाली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले व त्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. अल्पोपहाराच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यानंतर सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत विविध मनोरंजक खेळ, संवाद सत्रे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये महिला व मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
सायंकाळी ६ वाजल्यापासून ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाने वातावरण अधिक उत्साही आणि रंगतदार बनवले. संगीताच्या सुरांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्रातील अनुभव, करिअरच्या संधी तसेच भविष्यातील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमात निवृत्त गुरुजन व प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डायरेक्टर आरपीएल एक्सप्लोसिव्ह्स श्री. मल्लिकार्जुन, विभागप्रमुख प्रा किशोर मुळे तसेच माईन सेफ्टी विभागाचे संचालक श्री. आफताब अहमद यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सय्यद नजीमुद्दीन यांनी आभार प्रदर्शन करत सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर समूह छायाचित्र, सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व स्नेहभोजन अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा आपुलकीचे नाते दृढ झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.



