नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधावरून काँग्रेसवर भाजपचा हल्लाबोल
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन

चांदा ब्लास्ट
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल मानल्या जाणार्या “नारीशक्ती वंदन अधिनियम” (महिला आरक्षण विधेयक) यावरून देशातील राजकारण तापले असून, लोकसभेत काँग्रेस व ‘इंडी’ आघाडीतील काही मित्रपक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शविल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री सविता दंढारे, रविंद्र गुरुनुले, विधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकर, महिला महामंत्री सायली तांेडरे, नगर सेविका आशा देशमूख, नगर सेवक जितेश कुळमेथे, नगर सेवक नितेश गवळी, प्रविण गिलबिले, कौसर खान, निलिमा वनकर, वर्षा बोकडे, शितल ईटनकर, रिना साखरकर, सोनाली ईटनकर, कल्पना शिंदे, आशा ढेंगरे, अंजु हाजरा, रिता शाहा, रेनुका येरणे, आदिंची उपस्थिती होती.
महिला सक्षमीकरणाला चालना देणार्या या महत्त्वपूर्ण विधेयकाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांवर घाला घालण्यासारखे असल्याचे भाजपने म्हटले आहे. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असताना, त्याला विरोध करणे हे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली आहे.
महिलांना राजकारणात समान संधी मिळावी, त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले आहे. मात्र, या सकारात्मक बदलाला विरोध करून काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी महिलांविषयीची आपली नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली असल्याचा आरोप भाजपने यावेळी केला आहे.आंदोलनादरम्यान घोषणाबाजी, फलक प्रदर्शन करत निषेद करण्यात आला.



