ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाढत्या उन्हामुळे शाळा – महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

 नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5) हलके, पातळ, सच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. 6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. 12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) शक्यतो दुपारी 12 ते 4 या कालावधीत श्रमाची कामे टाळावीत. 15) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 16) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 17) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 18) दुपारच्या वेळेस मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये