ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उद्योगांची तपासणी करावी

पर्यावरण मंत्री मुंडे यांनी घेतला आढावा ; झरपट नदीच्या प्रदुषणाची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : गत 25-30 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात विविध उद्योग कार्यरत आहे. या उद्योगातून होणा-या प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. रोजगार मिळत असला तरी आरोग्यही महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिक याबाबत आता अधिक जागृत झाले आहे. नागरिकांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन तपासणी करावी. प्रदुषण कमी करण्यासाठी कोणत्या उद्योगांमध्ये किती मशीन लावल्या. प्रदूषण किती प्रमाणात कमी करण्यात आले व कोणकोणत्या उपाययोजना केल्या, या सर्व बाबी तपासाव्यात, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पुशसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे गुरवारी (दि.16) प्रदुषणाबाबत तसेच पुशसंवर्धन विभागाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, महापौर संगिता खांडेकर, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात विविध उद्योगांमार्फत होणाऱ्या प्रदूषणाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेऊन विविध ठिकाणी पाहणी केली.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण हा विषय अतिशय गंभीर असून याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. उद्योग हे रोजगार देण्यासाठी असले तरी उद्योगांसाठी शासनाचे नियम आहेत. मात्र हे नियम पायदळी तुडवून उद्योग सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. उद्योगांनी नियम पाळलेच पाहिजे. चंद्रपूरची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी मी आज येथे आली आहे. जिल्हास्तरावरून प्रदूषण कमी करण्यासंदर्भात एखादी उपाययोजना किंवा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला, तर त्यावर त्वरित कारवाई करावी. शासन उद्योगाच्या विरोधात नाही, मात्र त्यांच्या वाईट सवयींच्या नक्कीच विरोधात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योजकांची एक वेगळी बैठक लवकरच घेणार असून उद्योगांना सोबत घेऊन एक उत्कृष्ट प्लान तयार करू, जेणेकरून प्रदूषणापासून नागरिकांची सुटका होईल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि लोकांचाही सहभाग आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरातील प्रदुषणाची समस्या पाहता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा एक चांगला अधिकारी जिल्ह्यात द्यावा. प्रदुषणाबाबत आयआयटी पवई तसेच नीरी या संस्थेकडून समिती तयार करून अहवाल देण्यास सांगावे. वेकोलीने विंड फेंसिंग लावावी. उद्योगांनी एक किमी. परिसरात घनदाट हिरवी झाडे लावणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, वेकोलीच्या ओव्हर बर्डन मुळे चंद्रपुरात पुराचा धोका निर्माण होतो. प्रदुषणामुळे कॅन्सर, श्वसनाचे आजार वाढले आहे. तसेच कोल वॉशरीज मुळे शेकडो हेक्टर जमीन बाधित झाली असून उद्योगांच्या वाहन तपासणीकरीता यंत्रणा उभी करावी. तसेच चंद्रपुरात अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय उभारावे, अशा सुचना त्यांनी केल्या. आमदार देवराव भोंगळे म्हणाले, राजुरा क्षेत्रात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, कोल वॉशरीज मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच जडवाहतुकी मुळे रस्ते खराब झाले असून शेतीचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन विकास अधिका-यांची पदे रिक्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पशुसंवर्धन विभागाचा आढावा : राज्यातील सर्व पशुपालकांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करण्यासाठी नुकतीच राज्यस्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. अशाच प्रकारची कार्यशाळा आपापल्या जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर घ्यावी. पशुपालकांचे कुक्कुटपालन क्लस्टर करणे, दुधाळ जनावर पशुपालकांना अधिक प्रोत्साहित करणे, वन विभागाच्या जागेवर चारा उत्पादन करणे, आदी बाबी करून घ्याव्यात, अशा सुचना पर्यावरण मंत्री मुंडे यांनी दिल्या.

झरपट नदीच्या प्रदुषणाची पाहणी : तत्पुर्वी त्यांनी शहरातील झरपट नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. झरपट नदीचे पाणी स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे. तसेच या परिसरात सौंदर्यीकरण करण्याची ही गरज आहे. नदी पुनर्जीवन प्राधिकरणामध्ये झरपट आणि इरई नदीचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये