ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांवरील गुन्हे बिनशर्त मागे घ्या आणि जखमींवर मोफत उपचार करा; खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत पत्र

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नीट (NEET) परीक्षेतील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जाचा तीव्र निषेध करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, नीट परीक्षेतील अनियमितता आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे देशातील लाखो हुशार विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या पालकांची स्वप्ने अंधारात ढकलली गेली आहेत. जंतर-मंतरवर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी अमानुष, लाठीचार्ज केला, ही अत्यंत संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. ज्या कोमल हातांमध्ये देशाची सेवा करणारा ‘स्टेथॉस्कोप’ असायला हवा होता, ते हात आज पोलिसांच्या काठ्यांनी रक्ताळले आहेत.

याशिवाय, मुंबई पोलिसांकडून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जात असल्याचे अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब समोर येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जर विद्यार्थ्यांचे भवितव्य संपवण्याची धमकी देत असतील, तर देशातील तरुणांनी कोणाकडे दाद मागावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या निष्ठुर व्यवस्थेमुळे आणि अन्यायामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून, या आत्महत्या नसून व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने संवेदनशील पावले उचलणे गरजेचे आहे. लाठीचार्जात जखमी झालेल्या सर्व निष्पाप विद्यार्थ्यांना शासनाने तत्काळ मोफत व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार पुरवावेत, तसेच आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व पोलीस गुन्हे तत्काळ आणि विनाअट मागे घेण्यात यावेत. यासोबतच खोटे गुन्हे दाखल करून विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. संपूर्ण परीक्षेतील अपयश आणि भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे. देशातील करोडो तरुणांचे पालक या नात्याने गृहमंत्री अमित शाह यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रक्ताळलेल्या युवा पिढीला तत्काळ न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी पत्रात शेवटी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये