वर्धा येथे विद्यार्थी वाहतूक सुरक्षा समितीची बैठक; सुरक्षित वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार वर्धा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी वाहतूक सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनचालक व वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी विद्यार्थी वाहतूक सुरक्षित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये, मद्यसेवन करून वाहन चालवू नये, वाहनात प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स), अग्निशमन यंत्र तसेच आवश्यक सुरक्षा साहित्य ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळा, पालक, शिक्षक व वाहनचालकांचा व्हॉट्सअॅप गट तयार करून अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची तातडीने मदत घ्यावी, शाळेजवळ अमली पदार्थांची विक्री होत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, मुलींची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनीस ठेवावी तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्रे, फिटनेस व विमा अद्ययावत ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच शाळा–महाविद्यालय परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत 108, 112 व 1098 या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीमुळे विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पालक, शाळा प्रशासन व वाहनचालक यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.



