वर्धा शहरात गावठी मोहा दारू भट्टीवर धाड; 1 लाख 1 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : शहरातील दुर्गावती नगर, बुरुड मोहल्ला परिसरातील एका पडक्या घरात सुरू असलेल्या गावठी मोहा दारू भट्टीवर वर्धा शहर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹1,01,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी छापा टाकला असता घटनास्थळावरून 600 लिटर उकळव व कच्चा मोहा सडवा रसायन, 56 लिटर गावठी मोहा दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक आणि वर्धा शहर पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, विवेक बनसोड, अमोल ढेबळे, प्रविण शिंदे आणि महेंद्र डेकाटे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत.



