बोगस सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
१७ शेतकऱ्यांची फसवणूक : कंपनीसह संचालकाविरोधात भद्रावती पोलिसांत कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील १७ शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे व कथित बोगस सोयाबीन बियाणे विकून फसवणूक केल्याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात कंपनी व तिच्या प्रतिनिधीविरोधात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २३ जुलै २०२६ रोजी नोंदविण्यात आला.
तक्रारदार प्रफुल्ल शेषराव अडकिने (वय ४५), कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भद्रावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कांसा शिरपूर, मासळ व रत्नापूर येथील एकूण १७ शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीचे ‘हुतुतु’ जातीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. मात्र अपेक्षित प्रमाणात उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर कृषी विभागाने शेतपाहणी करून पंचनामे केले तसेच बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.
नागपूर येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित बियाणे अप्रमाणित व सदोष असल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर कंपनीचे संचालक राहुल रामभाऊ पुरमे व बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विरेंद्र देविदास केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



