जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्याबाबत प्रयत्न करणार – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
गवळाऊ गाईचे संवर्धन आवश्यक - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा, दि.15 (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरुपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पंकज मुंडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.जगदीश बुकतरे यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कृषी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाणी आणि चाऱ्याअभावी पशुंचे स्थलांतरण करावे लागू नये. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या लावल्या जातात. त्याच धर्तीवर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरण केले जाते, तेथे गावाशेजारीच पाण्याची व्यवस्था बघून कायमस्वरुपी छावण्या उभ्या राहिल्या तर आपण स्थलांतरण थांबवू शकू. त्यामुळे यासाठी काय करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
ठिकठिकाणी गाईंचे क्लस्टर उभे राहात आहे. विशिष्ठ गाईंना विशिष्ट वातावरण लागते. त्यामुळे जिल्ह्यात गाईंचे क्लस्टर तर कराच शिवाय येथले वातावरण पाहता शेळींचे क्लस्टर केले तर शेतकरी व पशुपालकांना अधिक फायदा होईल. अशा क्लस्टरसाठी पशुसंवर्धन विभागाचे काही सहकार्य लागल्यास उपलब्ध करून देऊ. यासाठी सचिवांना निर्देश देण्यासह अधिकाऱ्यांना यात पुढाकार घेण्यासाठी निर्देश देऊ, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
वर्धा जिल्ह्यात गवगाऊ ही उत्तम दर्जाची देशी गाय आहे. परंतू गेल्या काही वर्षात या गाईंची संख्या कमी होत आहे. या गाईचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व काही पशुपालकांनी बैठकीत व्यक्त केले. या गाईच्या संवर्धनासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. यासाठी काय धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात पशुधन व दुग्धव्यवसाय वाढविण्यासाठी विविध विभागाच्या सहकार्याने चांगले काम करू, असे ही त्यांनी सांगितले. पशुसंवर्धनचे अनेक नवीन दवाखाने बांधली जात आहे. बांधकामावेळीच या इमारतींवर सोलर बसविण्यात यावे. जुन्या दवाखान्यावर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोलर बसविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सालोड येथे होत असलेल्या गोट मार्केटची माहिती त्यांनी जाणून घेतली.
गवळाऊ गाईचे संवर्धन आवश्यक – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात उत्तम दर्जाच्या गवळाऊ या देशी गाई आहेत. या गाईंचे प्रमाण कमी होत आहे. या गाईचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्याला सहकार्य करावे, अशी विनंती पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना केली. कारंजा तालुक्यात हेटीकुंडी येथे जनावरांसाठी ग्रासलॅन्ड स्कुल विकसित करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित पशुपालक आणि शेतकऱ्यांनी पशुधन व दुध वाढविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
सुरुवातीस मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्ह्यातील पशुधन, दुग्धव्यवसाय, दुधाची उपलब्धता, जनावरांची स्थिती याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात याबाबतीत काय करता येईल यासह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण
जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेतून वर्ग 1 ते 10 पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थीनींना 25 हजार रुपयांचे किसान विकास पत्र देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मंत्री पंकजा मुंडे व पालकमत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थीनींना वाटप करण्यात आले. सेसफंड योजनेतूनच दिव्यांगांना स्कुटीचे वितरण केले जाते. एका लाभार्थ्यांस चाव्या देऊन स्कुटी वितरीत करण्यात आली. यावेळी मान्यवरांसह जिल्हा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य संजय जाधव उपस्थित होते.



