ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घनकचरा व्यवस्थापन कामाचा बट्ट्याबोळ ; दोषीवर कारवाईची मागणी

नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ नगर पंचायत अंतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने नगरपंचायतीने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न करता अंदाजपत्रकानुसार काम केलेले नाही. शहरातील स्वच्छता मोहीम केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे चित्र असून प्रत्यक्षात अनेक भागांतील नाल्या गाळ, कचरा आणि घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नगरपंचायतीकडून शहरवासीयांकडून नियमित कर वसूल केला जात असला तरी त्याबदल्यात आवश्यक नागरी सुविधा व स्वच्छता सेवा मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक वेळा सूचना करूनही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची योग्य साफसफाई केली जात नसल्याची तक्रार खुद्द नगरसेवकांनी केली आहे.

नगरसेवकांनी निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित ठेकेदार केवळ थातूरमातूर काम करून कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवत बिलांची उचल करीत आहे . त्यामुळे संपूर्ण कामाची तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गटनेत्या गीता डोहे, नगरसेवक किशोर बावणे, नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेविका आशा झाडे ,नगरसेविका सविता तुमराम तसेच भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर आदी उपस्थित होते.

        शासनाकडून शहर स्वच्छ व सुंदर राहण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्ध करून दिली जाते परंतु घनकचरा व्यवस्थापन कामात मंजूर अंदाज पत्रकानुसार व करारातील अटी. शर्तीनुसार काम होत नसल्यामुळे कोरपना स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच दिसत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे.

       श्रीमती गीता डोहे गटनेत्या नगरपंचायत कोरपना

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये