एसआयआर अंतर्गत १०० टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2026 पासून विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हीजन – एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आज (दि.15) राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आगामी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षाने सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्याकरीता मतदारांना प्रवृत्त करावे. प्रत्येक मतदार यादी भागाकरिता प्रत्येकी एक (1) याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मतदार यादी भागांकरिता, सर्व राजकीय पक्षाने मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावा. तसेच त्याची सूचना विहित नमून्यात संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात.
‘शून्य त्रुटी’ मतदार यादी तयार करणे, हे या सखोल मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या निवासस्थानी प्रत्यक्ष पडताळणीसाठी येतील, तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाची अचूक माहिती आणि आवश्यक असल्यास ओळख पुराव्याची कागदपत्रे देऊन सहकार्य करावे. लोकशाहीच्या या बळकटीकरण प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, प्रभारी तहसीलदार ओकांर ठाकरे यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणा पोहचणार घरोघरी : सामान्यतः राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणात प्रामुख्याने अर्जांच्या आधारे मतदार यादी अद्ययावत केली जाते. मात्र, आगामी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत जिल्ह्यातील संपूर्ण मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी 100 टक्के घरोघरी भेट दिली जाणार आहे. यामध्ये केवळ अर्जांची वाट न पाहता, प्रशासकीय यंत्रणा स्वतः प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन मतदारांच्या वास्तव्याची आणि पात्रतेची प्रत्यक्ष खात्री करणार आहे.
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे कार्य व जबाबदारी : सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि वस्तीवर प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती तपासणे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित आणि दुबार नावे शोधून ती वगळण्याची विहित कायदेशीर कार्यवाही करणे. ज्या पात्र नागरिकांनी (वय 18 वर्ष पूर्ण) अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांचे अर्ज नमुना 6 मध्ये जागेवरच भरून घेणे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एकाच ठिकाणी एकत्रित असल्याची खात्री करणे, अशी जबाबदारी बीएलओ पार पाडणार आहेत.
एसआयआर मोहिमेकरीता अशी आहे जिल्ह्यातील आकडेवारी : एकूण मतदार 18 लक्ष 76 हजार 18 असून यात पुरुष मतदारांची संख्या 9 लक्ष 48 हजार 902, स्त्री मतदार 9 लक्ष 27 हजार 66 तर तृतीयपंथी मतदार 50 आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 47728 असून 85 वर्षांवरील वयोवृध्द मतदारांची संख्या 12693 तर दिव्यांग मतदार 8957 आहेत.



