ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्तव्य बजावताना बीएलओचा अपघात

उपचारासाठी शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे कार्यरत असलेले व सध्या विशेष मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत बीएलओ म्हणून कर्तव्य बजावत असलेले राकेश नानाजी ठवरे (वय ३५) हे आज सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान नांदाफाटा येथून गडचांदूरकडे एसआयआरच्या कामासाठी येत असताना देवाळकर यांच्या शेताजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना तातडीने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच गडचांदूर परिसरातील मोठ्या संख्येने बीएलओ व शिक्षक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. राकेश ठवरे हे विनाअनुदानित तत्त्वावरील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शिवाय ते शासकीय कर्तव्य बजावत असताना हा अपघात झाल्याने त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत, मोफत उपचार आणि विशेष सहकार्य देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय अनेक बीएलओंनी एसआयआरच्या कामादरम्यान प्रचंड मानसिक ताण, कामाचा अतिरिक्त भार आणि दबावाखाली काम करावे लागत असल्याची भावना व्यक्त केली. शिक्षकांना शाळेतील अध्यापन आणि क्षेत्रीय काम यामध्ये समतोल साधणे कठीण होत असल्याने शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एसआयआरचे काम अत्यंत जोखमीचे आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना बीएलओ राकेश ठवरे गंभीर जखमी झाले. शासनाने त्यांच्या उपचारासाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच सर्व बीएलओंसाठी अपघात विमा संरक्षण लागू करावे.

– तुषार बावणे, आरोग्य सभापती, नगर परिषद, गडचांदूर

बीएलओ प्रतिनिधींनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्याकडे मदतीची मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे (एसडीओ) पाठविल्याचे सांगितले, मात्र सध्याच्या नियमांनुसार तत्काळ आर्थिक मदत देण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये