गोंडपिपरी नगरपंचायतीत मुख्याधिकाऱ्यांचा ‘मनमानी’ कारभार
नगरसेवकांच्या निवेदनाला केराची टोपली..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
स्थानिक नगरपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक चौधरी हे नगरसेवकांच्या अधिकारांना डावलून ‘मनमानी’ पद्धतीने कारभार करत असल्याचा गंभीर आरोप शहरातील तब्बल १५ नगरसेवकांनी केला आहे. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन दिलेल्या निवेदनाला मुख्याधिकाऱ्यांनी चक्क ‘केराची टोपली’ दाखवल्याने शहराच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या लिपिकांच्या बदल्यांबाबत नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्यांमुळे कामकाजात अडथळा येत असून नागरिकांची कामे रखडत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल न घेता स्वतःच्याच निर्णयावर ठाम राहून लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्वच गटाचे नगरसेवक या विषयावर एकवटले आहेत. नगरसेवकांचे म्हणणे आहे की, “जर मुख्याधिकारी १५ नगरसेवकांच्या सामूहिक मागणीचा सन्मान करत नसतील, तर शहराचा विकास कसा होणार?” मुख्याधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे विकासकामांच्या फाईल्स अडकून पडल्या असून, साध्या कामांसाठीही नागरिकांना नगरपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मुख्याधिकारी कोणत्याही कामात नगरसेवकांना विश्वासात न घेता आपल्याच पद्धतीने निर्णय घेत असल्यामुळे सर्व सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते, मात्र येथे प्रशासन लोकप्रतिनिधींनाच जुमानत नाहीये,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका नगरसेवकाने व्यक्त केली.
या गंभीर विषयावर वरिष्ठ स्तरावरून लक्ष देऊन मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यात यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. आता या वादावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गोंडपिपरी शहराचे लक्ष लागले आहे.



