तथागत युथ क्लबतर्फे भीम जयंती उत्साहात साजरी
संविधान जनजागृतीसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चंद्रपूर जिल्ह्यातील मेरा युवा भारत संलग्नित तथागत यूथ क्लब, तारसा बुज. आणि भारतीय बौद्ध महासभा, तारसा बुज. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमांमुळे समाजातील युवकांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना मनोरंजनासोबतच प्रेरणादायी संदेशही देण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रत्नमाला प्रकाश भडके उपस्थित होत्या. तसेच माजी अध्यक्ष माणिकचंद उराडे, गुरुदास कुकुडकर, राजकपूर भडके, तथागत यूथ क्लबचे अध्यक्ष निखिल भडके, उपाध्यक्ष आकाश भडके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
युवकांना मार्गदर्शन करताना युवा प्रबोधनकार अनिकेत दुर्गे यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील कायद्यांचा योग्य वापर आणि समाजघडणीत युवकांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित युवकांना नवी दिशा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जानिया सवाईमुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपाली कुकुडकर यांनी मानले. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजातील एकात्मता आणि जागृती अधिक दृढ होत असल्याचे मत मान्यवराकडून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांता भडके, कोमल उराडे सुमन कुकुडकर, अहिल्या अलोणे, उज्वला उराडे, सरिता झाडे, किरण अलोणे, अनिल कुकुडकर, संध्या कुकुडकर आदिनी परिश्रम घेतले.



