
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध (‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’) कडक कारवाई करण्यात येत आहे.
सन २०२४–२५ या कालावधीत महामार्ग पोलिसांनी विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यात विशेषतः ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, ६४ वाहन चालक दारू पिऊन वाहन चालविताना आढळले असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
तसेच, ई-चालान, इंटरसेप्टर वाहन व ब्रीथ अॅनालायझर मशिनच्या सहाय्याने कारवाई अधिक प्रभावी करण्यात आली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०,३९६ प्रकरणांमध्ये एकूण ₹१,७०,७९,७०० (एक कोटी सत्तर लाख एकोणऐंशी हजार सातशे रुपये) इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, दंड न भरलेल्या प्रकरणांमध्येही पुढील कारवाई करण्यात येत आहे.
*महामार्ग पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, महामार्ग पोलीस केंद्र चंद्रपूर येथील माया चाटसे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.*
दरम्यान, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, दारू पिऊन वाहन चालवू नये, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, तसेच वाहनास उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अपघाताच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक १०३३ वर संपर्क साधण्याचेही आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.



