भाजपा महानगर कार्यालयात विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी बैठक
राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व आ. किशोर जोरगेवार यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट
पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियान जिल्हा प्रशिक्षण वर्ग, एसआरआय अभियान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच २६ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे गांधी चौक येथील पक्षाच्या महानगर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार सोम, महामंत्री रवींद्र गुरुनुले, मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, मनपा गटनेते शेखर शेट्टी, बलराम डोडाणी, नगरसेविका सविता कांबळे, सारिका संदुरकर, आशा देशमुख, सरला कुळसंगे, ज्योती जिवने, शीतल गुरुनुले, अनुजा तायडे, नगरसेवक संजय कंचर्लावार, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, विनोद खेवले, सुभाष अदमाने, प्रदीप किरमे, आशिष मासिरकर, सुचिता लुटे, मीना मोरपाका, वैशाली ढवस, राम वर्मा, गणेश पिंपळकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
बैठकीत आगामी कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. विशेषतः पंडित दीनदयाल प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कौशल्यवृद्धी, एसआरआय अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून ती विचारांची आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी असलेली संघटना आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जबाबदाऱ्या समजून घेत त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. आगामी सर्व कार्यक्रम हे समाजाशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात जनसंपर्क वाढवून पक्षाची विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
तर यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, संघटन बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यपद्धती अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रम हा केवळ औपचारिकता नसून, तो जनतेशी जोडण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेल्या ‘अंत्योदय’च्या विचारातून आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. एसआरआय अभियान, प्रशिक्षण वर्ग तसेच ‘मन की बात’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद अधिक मजबूत होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत त्यांच्या विचारांचा प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घेऊन हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत विविध कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



