ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी दिलेल्या शिक्षण आणि समतेच्या संदेशातूनच समाजाची खरी प्रगती शक्य – आ. जोरगेवार

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता यांविरुद्ध लढा दिला. त्यांनी स्त्री शिक्षण, शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी मोठे कार्य केले. त्या काळात समाजात असलेल्या अज्ञान आणि भेदभावाच्या अंधारात त्यांनी ज्ञानाचा दिवा पेटवला. त्यांनी दिलेल्या शिक्षण आणि समतेच्या संदेशातूनच समाजाची खरी प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती महोत्सवानिमित्त गांधी चौक येथे युवा माळी समाजाच्या वतीने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार गिरिराज गांधी, उमपमहापौर प्रशांत दानव, नगर सेवक नंदु नागरकर, भालचंद्र दानव, अरुन तिखे, राजु बनकर, तनु रायपूरे, सुनिता लोढीया, शैलेश इंगोले, कार्तिक वानखेडे, अभिजित मारोडकर, सागर वानखेडे, राकेश चहारे, आशुतोष वानखेडे, रुषी राउत, रजत वानखेडे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसून, ते आचरणात आणण्यासाठी आहेत. समाजात अजूनही विषमता आणि अज्ञानाचे काही अंश दिसून येतात. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजप्रबोधनाचे कार्य पुढे नेणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

युवा माळी समाजाने आयोजित केलेला हा व्याख्यान कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असून, अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला महान व्यक्तींच्या विचारांची ओळख होते आणि त्यातून प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

आपण महात्मा फुले यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, येथे एक उत्तम व सुसज्ज सभागृह उभारण्यात आले आहे. या सभागृहाच्या माध्यमातून समाजातील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, तसेच युवकांना एक सकारात्मक व्यासपीठ उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

आपण सर्वांनी शिक्षणाला प्राधान्य देत समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्यासाठी काम केले पाहिजे. महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक समता यांसाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

महात्मा फुले यांनी दिलेल्या ‘सत्य, समता आणि बंधुता’ या विचारांचा अंगीकार करून आपण एक सशक्त आणि प्रगत समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी इतिहास संशोधक तथा सुप्रसिद्ध वक्ते गिरिषजी गांधी यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री माता महाकालीची मूर्ती देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये