अंत्योदयाच्या विचारातून जनसेवेचा संकल्प करा – आ. जोरगेवार
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत बाबूपेठ मंडळात मंडळ प्रशिक्षण वर्ग

चांदा ब्लास्ट
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’चा विचार मांडला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे. हा त्यांचा विचार केवळ घोषवाक्य नसून, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आचरणात आणण्याचा संकल्प आहे. ‘अंत्योदय’च्या विचारातून जनसेवेचा संकल्प करा, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत बाबूपेठ मंडळाकरिता बाबूपेठ येथील महादेव मंदिर येथे मंडळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, प्रदेश विशेष आमंत्रित सदस्य तुषार सोम, महिला विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, महामंत्री रविंद्र गुरुनुले, श्याम कनकम, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, महिला महामंत्री सायली येरणे, राहुल सराफ, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, दिवाकर पुडट्टवार, प्रलय मशाखेत्री, निलिमा वनकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कोणतीही संघटना मजबूत व्हायची असेल तर केवळ संख्या नव्हे, तर कार्यकर्त्यांची गुणवत्ता, त्यांचे प्रशिक्षण, त्यांची विचारसरणी आणि त्यांची बांधिलकी महत्त्वाची असते. म्हणूनच असे प्रशिक्षण वर्ग आपल्या कार्यकर्त्यांना दिशा देतात, त्यांची क्षमता वाढवतात आणि त्यांना समाजकार्यासाठी अधिक सक्षम बनवतात. आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पक्षाबद्दलची निष्ठा, उत्साह आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द स्पष्टपणे दिसून येते. तुमचा हा उत्साहच भारतीय जनता पार्टीच्या वाढीचा आणि यशाचा खरा पाया आहे.
आपण केवळ राजकारण करण्यासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी काम करतो. शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे हीच आपली खरी जबाबदारी आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या वतीने स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाइन यांसारखी महागडी प्रशिक्षणे महिलांना निशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे ५ हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी अनेकांनी स्वतःचा रोजगार सुरू केला आहे. हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे. आपणही आपल्या भागात असे उपक्रम आयोजित करावेत, यासाठी लागणारी सर्व यंत्रणा आम्ही उपलब्ध करून देऊ.
तसेच, गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी चंद्रपूर मतदारसंघात अभ्यासिकांचे जाळे उभारण्यात आले आहे. बाबूपेठ येथील अभ्यासिकेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, लवकरच ते लोकार्पित करण्यात येणार आहे. ‘प्रशिक्षण, शिक्षण आणि सेवा’ या त्रिसूत्रीवर कार्यकर्त्यांनी काम करावे, असे ते म्हणाले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्यपद्धती, जनसंपर्क, नेतृत्व कौशल्य आणि समाजसेवेचे विविध पैलू समजतील. हे ज्ञान प्रत्यक्षात वापरून आपण आपल्या भागात अधिक प्रभावीपणे काम करू शकतो.
अशा प्रशिक्षण वर्गांमुळे संघटनेचे बळ अधिक दृढ होईल आणि आपण अधिक संघटित, सक्षम व प्रभावीपणे जनतेची सेवा करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘अंत्योदय’चा संकल्प पूर्ण करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या प्रशिक्षण वर्गाला बाबूपेठ मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



