२२६ घरे कागदावर ‘पूर्ण’, पण शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थी चार महिन्यांपासून वणवण
कोरपना तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांची थट्टा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पक्के घर मिळून हक्काची छत मिळावे, या आशेने कोरपना तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी घरकुल योजनेअंतर्गत घरांची कामे पूर्ण केली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून शेवटचा हप्ता रखडल्याने लाभार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय दप्तरी २२६ घरे ‘फिजिकली कम्प्लीट’ (भौतिकदृष्ट्या पूर्ण) दाखवण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खिशात मात्र शेवटची दमडीही पडलेली नाही.
कागदोपत्री आकडेवारीचा खेळ
तालुक्यात प्रशासनाकडून घरकुल पूर्ण झाल्याचा आकडा फुगवून सांगण्यात येत आहे. २२६ लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाल्याची नोंद ऑनलाईन प्रणालीवर करण्यात आली आहे. मात्र, यातील अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करून किंवा कर्ज काढून घराचे काम कसेबसे पूर्ण केले आहे. आता चार महिने उलटूनही शेवटचा हप्ता मिळत नसल्याने या कुटुंबांना सावकारी कर्जाचा डोंगर समोर दिसत आहे. काही लाभार्थ्यांनी तर गृहप्रवेश करून नवीन घरात राहणे सुरू केले आहे, मात्र हप्त्याअभावी घराचे किरकोळ फिनिशिंग आणि देणी अद्याप बाकी आहेत.
रेतीचा उदोउदो, पण पैशांचे काय?
राज्य शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याच्या निर्णयाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. “शासनाने रेती तर मोफत दिली, पण घर बांधण्यासाठी लागणारा मजुरीचा खर्च आणि इतर साहित्यासाठी पैसे कुठून आणायचे?” असा संतप्त सवाल लाभार्थी विचारत आहेत. एकीकडे मोफत रेतीचा उदोउदो सुरू असताना, दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील हप्ता अडकल्याने कोरपना तालुक्यातील घरकुल योजनेची स्थिती विदारक झाली आहे.
प्रशासकीय सावळागोंधळ चव्हाट्यावर
धक्कादायक बाब म्हणजे, काही घरकुले प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही केवळ आकडेवारी सुधारण्यासाठी ती प्रशासकीय स्तरावर ‘पूर्ण’ दाखवण्यात आली आहेत. यामुळे लाभार्थ्यांची अडचण झाली असून त्यांना वारंवार पंचायत समितीचा चकरा माराव्या लागत आहे.
प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊनही ते चिंतेत आहेत. आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन रखडलेला हप्ता तातडीने मार्गी लावणार का, याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.
(मागील चार महिन्या पासून घरकुलाचा शेवटचा हफ्ता मिळाला नाही त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाने शेवटच्या टप्पा लवकर वितरित करावा जेणेकरून लाभार्थ्यांची आर्थिक समस्या अधिक जटिल होणार नाही. संदीप पाचभाई घरकुल लाभार्थी)
(नवीन प्रणाली व तांत्रिक अडचणीमुळे काही घरकुल लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता अडकला आहे. श्रीकांत बोबडे गट विकास अधिकारी कोरपना)



