ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या माऊलीची लेक झाली ‘खाकी’ वर्दीची मानकरी

ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनतर्फे कुमारी कावेरी तुपट हिचा गौरव; संघर्षातून पोलीस दलात निवड झाल्याने सर्वत्र कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

       परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी, जर मनाशी जिद्द आणि परिश्रमाची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळते, हे ब्रह्मपुरीतील एका लेकीने सिद्ध करून दाखवले आहे. हनुमान नगर, ब्रह्मपुरी येथील कुमारी कावेरी प्रमोद तुपट हिची चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून, तिच्या या यशाने संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल नुकताच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे तिचा जंगी सत्कार करण्यात आला.

         कावेरीचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर कावेरीची आई, उषा प्रमोद तुपट यांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. स्वतःच्या पतीची साथ सुटलेली असतानाही खचून न जाता, त्यांनी लोकांच्या घरी भांडी घासून आणि मजुरी करून आपल्या मुलीला वाढवले. गरिबीशी दोन हात करत त्यांनी कावेरीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि तिला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळवून दिले. आईचे कष्ट आणि कावेरीची चिकाटी आज फळाला आली असून, तिने पोलीस दलात मानाचे स्थान मिळवले आहे.

        कावेरीच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल घेत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील आणि शांतता कमिटीच्या बैठकीत तिचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण आणि पोलीस हवालदार अरुण पिसे यांच्या हस्ते कावेरीला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

         यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले म्हणाले की,”कावेरीने मिळवलेले यश हे केवळ तिचे यश नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करू इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणीसाठी एक आदर्श आहे. अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस दलात भरती होण्यासाठी एक मोठे व्यासपीठ आणि प्रेरणा मिळेल.”

       या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस हवालदार अरुण पिसे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस पाटील तालुका संघटनेचे अध्यक्ष निलेश भोयर, सचिव वीरदर्जी देशमुख, सदस्य चंद्रशेखर कोसलवार, अमोल मोरांडे, जयाबाई मीसार, पोलीस पाटील फुलझेले, भूषणजी कुथे, अकुलजी राऊत, प्रमोद घुबडे, राहुल धनपालजी वंजारी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील आणि बौद्ध समाज शांतता कमिटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कावेरीच्या या यशामुळे हनुमान नगर परिसरात आनंदाचे वातावरण असून, एका कष्टकरी माऊलीच्या लेकीने खाकी वर्दी परिधान करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये