ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इरई धरण,तुकुम व रामनगर जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी

उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांवर भर

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर श्री. प्रशांत दानव व स्थायी समिती सभापती सौ.मनस्वी गिऱ्हे यांनी आज इरई धरण,तुकुम व रामनगर जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP) येथे भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली.

  यावेळी महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावेत. पाईपलाईनमधील गळती त्वरित शोधून दुरुस्त करणे, योग्य दाबाने पाणीपुरवठा करणे, पाणी साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करणे आणि क्लोरीनेशन प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता उच्च दर्जाची राखणे यावर विशेष भर देण्यात यावा.

  तुकूम येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना, सदर प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के सिव्हिल काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले. उर्वरित काम गतीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर हे केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच इरई धरणावरील जॅकवेल व बीपीटी कामांची पाहणी करताना, सध्या ४० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले.

  स्थायी समिती सभापती यांनीही पाणीपुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे व नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. उन्हाळ्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी योजना सज्ज ठेवण्यासह आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तयारी ठेवण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराची पुढील ३० वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविणे शक्य होणार आहे. तसेच ‘अमृत’ योजनेअंतर्गत सुरुवातीला शहरातील दोन प्रभागांना २४ तास अखंड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. राज्य शासनाकडुन निधी वेळेत उपलब्ध झाल्यास प्रकल्पाच्या कामांना अधिक गती मिळेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

   पाहणीदरम्यान इरई धरणातील उपलब्ध जलसाठा, दररोज होणारी पाणीउचल क्षमता, शहराच्या एकूण पाणीगरजेच्या तुलनेत साठ्याचे नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच रामनगर जलशुद्धीकरण प्रकल्पातील गाळणी प्रक्रिया, क्लोरीनेशन प्रणाली व वितरण यंत्रणा याबाबतही माहिती देण्यात आली.

   या पाहणीवेळी महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप चिद्रवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता विवेक ताम्हण, अभियंता सोनू थुल, सागर सिडाम तसेच संबंधित विभाग प्रमुख, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये