‘राजमाता राणी हिराई महोत्सवा’साठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; भव्य आयोजनाच्या तयारीला वेग
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूक्ष्म नियोजन

चांदा ब्लास्ट
आदिवासी परंपरा आणि सांस्कृतिक वैभव अधोरेखित करण्यावर विशेष भर
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी २० एप्रिल रोजी होणाऱ्या ‘राजमाता राणी हिराई महोत्सवा’च्या भव्य आयोजनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना सूक्ष्म नियोजनाचे स्पष्ट निर्देश दिले. महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असल्याने तो ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरावा, यासाठी सांस्कृतिक वैभव, आदिवासी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला. महोत्सवाच्या प्रत्येक घटकाचे नियोजन काटेकोरपणे करून कोणतीही उणीव राहू नये, अशा सूचना देत त्यांनी या उपक्रमाला व्यापक आणि आकर्षक स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाधिकारी वसूमना पंत, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे तसेच नगरसेवक प्रज्वलंत कडू, रवी लोणकर, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नम्रता ठेमस्कर, सुरज पेदुलवार आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘राजमाता राणी हिराई महोत्सवा’चे हे पहिलेच वर्ष असून हा महोत्सव सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचा विशेष आनंद आहे.’ चंद्रपूरकर म्हणून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात होत असल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा महोत्सव चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, यामुळे राजमाता राणी हिराई यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना आ.मुनगंटीवार यांनी दिल्या.
सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ,सरकारी अधिकारी व या कार्यक्रमासाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य यांची एक आयोजन समिती तयार करावी असे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रम स्थळाची पुनर्पहाणी करून आवश्यक सोयी-सुविधांची खात्री करावी, तसेच कार्यक्रमाचा “मिनिट टू मिनिट” आराखडा तयार करण्याच्या आ. मुनगंटीवार यांनी सूचना दिल्या.
आदिवासी कला-नृत्य स्पर्धा, बक्षिसे व प्रमाणपत्रांचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. राणी हिराई यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे तयार करण्यावर भर देत, महोत्सवाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी असे आ.मुनगंटीवार यांनी निर्देश दिले.
कार्यक्रमादरम्यान पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, ट्रॅफिक नियंत्रण, मोबाईल टॉयलेट, वैद्यकीय सुविधा, कॅन्सर डिटेक्शन व्हॅन व ॲम्बुलन्स यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आदिवासी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष काउंटर, क्यूआर कोडसह माहितीपत्रके उपलब्ध करून द्यावी अशा सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. हा महोत्सव आदिवासी समाजाच्या श्रद्धेचा आणि इतिहासाच्या गौरवाचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वय साधून तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.



