शिवस्मारकाचा प्रश्न केवळ विकासाचा नसून भावनांचा आहे
दुर्लक्ष कराल तर मोदी आणि फडणवीस सरकारला राजकीय गंभीर परिणाम भोगावे लागतील - रामहरी मेटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी पाहिलेल्या शिवस्मारकाच्या स्वप्न पूर्ततेसाठी जय शिवसंग्राम राज्यभर आंदोलन छेडणार..!
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक ठरणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या कामाला 30 वर्षापासून वर्षानुवर्षे विलंब होत असल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवस्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे लहान भाऊ जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी जय शिवसंग्राम येणाऱ्या 14 ऑगस्ट 2026 रोजी स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या स्मृतीदिना पासून राज्यभरात केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस, शिंदे,पवार महायुती सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासारख्या अभिमानाच्या प्रकल्पाकडे सरकारचे हे दुर्लक्ष असह्य आहे. आश्वासने दिली, भूमिपूजन झाले, निधी मंजूर झाला पण प्रत्यक्ष कामाचा वेग मात्र कासवगतीनेही पुढे सरकत नाही. हा विलंब नेमका कोणाच्या फायद्यासाठी ? असा थेट सवाल रामहरी मेटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांना उपस्थित केला आहे.
शिवस्मारक हा केवळ प्रकल्प नसून तो कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडत चालला आहे. दरम्यान, वाढणारा खर्च, बदलणाऱ्या योजना आणि वारंवार होणारे तांत्रिक अडथळे यामुळे जनतेचा संयम आता सुटू लागला आहे.
जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “केंद्र आणि राज्य सरकारने ठोस वेळापत्रक जाहीर करून कामाला गती दिली नाही, तर राज्यभरातून जय शिवसंग्रामसह तमाम शिवप्रेमी एकत्र येऊन तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. हे आंदोलन केवळ निषेधापुरते मर्यादित राहणार नाही, तर केंद्र आणि राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणारे असेल.”
शिवप्रेमी संघटनांनीही या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, “शिवरायांच्या स्मारकासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,” अशी भावना व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत असून, सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सातत्याचा अभाव, प्रशासकीय अडथळे आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही विलंबाची प्रमुख कारणे आहेत. मात्र याचा परिणाम थेट जनतेच्या भावनांवर होत आहे याचे भान सरकारला कधी येणार ? आता प्रश्न एकच,शिवरायांच्या स्मारकासाठी अजून किती वाट पाहायची ?
राज्य सरकार या वाढत्या असंतोषाची दखल घेऊन तातडीने निर्णय घेणार की जनतेच्या रोषाचा सामना करणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारण्याची घोषणा केवळ राजकीय स्वार्थासाठीच का ?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा सरकारतर्फे सन 2014 मध्ये स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पाठपुराव्यामुळे केली होती. आज 2026 साल आलं तरी या स्मारकाचं काम पूर्णपणे ठप्प पडलेल आहे. एकेकाळी निवडणुकांच्या तोंडावर शिवस्मारक हे आमचे ध्येय आहे अशी वल्गना करणारे केंद्र आणि राज्य सरकार आज गप्प का ? गेली अनेक वर्ष निवडणुका जवळ आल्या की शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांना जोर दिला जातो. हे विषय उसळी मारून वर आणले जातात, निवडणुका जिंकल्या की याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते हे संताप जनक आहे.
कसं आहे नेमकं शिवस्मारक….?
महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शिवरायांचे शिवस्मारक हे मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर तर नरिमन पॉईंट पासून पाच किलोमीटर अंतरावर तयार होणार आहे.अरबी समुद्रातील एका खडकाळ भागावर 15.96 हेक्टर जागेत हे स्मारक शानदार उभारले जाणार आहे.या स्मारकामध्ये संग्रहालय, थिएटर,माहिती देणारी दालनं,उद्यान आणि शिवाजी महाराजांचा ब्राँझचा पुतळा यासह आई तुळजाभवानी देवी मंदिराचा ही समावेश या परिसरात असणार आहे. यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. या स्मारकाच्या भूभागावर हेलीपॅडही बांधण्यात येणार आहे. दररोज दहा हजारापेक्षा अधिक पर्यटक या स्मारकाला भेट देतील अशी क्षमता उभारली जाणार आहे. जगातले सगळ्यात उंच हे स्मारक उभारले जाणार आहे. शिवस्मारकाची उंची ही 212 मीटर तब्बल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमध्ये येऊन 24 डिसेंबर 2016 ला जलपूजन केलं आणि स्मारकाची चर्चा जोरदार वाढली.मात्र दुर्दैवाने दहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाला नाही हे वास्तव आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचं मोठं अपयश आहे.
स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांचे शिवस्मारकाचे स्वप्न सरकार कधी पूर्ण करणार ?
शिवरायांचे शिवस्मारक अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक उभारले जावे हे स्वप्न शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी पाहिलं. त्यांची या प्रश्नावर असलेली धडपड,अभ्यास आणि प्रामाणिकता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगत लक्ष घालून मेटे साहेबांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केले. मात्र दुर्दैवाने मेटे साहेब जिवंत असताना या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून अनेक तांत्रिक अडचणी त्यांच्यासमोर आणल्या गेल्या. त्यावर मेटे साहेबांनी कायदेशीररित्या अभ्यासपूर्ण मांडणी करून शिवस्मारक उभारणीमध्ये आलेले सर्व अडथळे दूर करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. यावर न्यायालय देखील सकारात्मक झाले.मात्र दुर्दैवाने सरकार शिवप्रेमींच्या या भावनिक प्रश्नांवर राजकारण करत आहे का ? असा प्रश्न आता शिवस्मारकाची उभारणी रखडल्यामुळे शिवप्रेमींच्या मनात उभारला जात आहे. जर याचा उद्रेक झाला तर याचे परिणाम सरकारला सोसावे लागतील हे नक्की.
शिवबाच्या महाराष्ट्रात शिवस्मारकासाठी 30 वर्ष संघर्ष करावा लागतो हे लाजिरवाणे ?
14 जून 1996 ला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारक उभारण्याची घोषणा महायुतीच्या सत्तेत असताना केली. तेव्हापासून शिवस्मारक उभारण्याच्या संकल्पनेला 2026 उजाडले तरीदेखील न्याय मिळत नाही.जो महाराष्ट्र शिवबाने घडवला, स्वराज्याच्या स्वाभिमानाचा नारा या महाराष्ट्रात दिला. त्याच महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात शिवरायांचे शिवस्मारक तीस वर्षापासून उभारले जात नाही ? ही बाब निश्चितच लाजिरवाणी आहे.स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, स्वर्गीय तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यासह अनेकांनी शिवस्मारकांच्या उभारणीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न सरकारच्या नाकर्तेपणामुळे निष्फळ ठरत आहेत का ? असा प्रश्न शिवप्रेमींच्या मनात उभारला जात आहे.
स्वर्गीय मेटे साहेबांच्या निधनानंतर दुर्दैवाने याचा पाठपुरावा कोणत्याही नेत्याने केला नाही..?
शिवस्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते विनायकराव मेटे यांचा 14 ऑगस्ट 2022 रोजी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या घटनेला जवळपास चार वर्ष पूर्ण होत आले आहेत. दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर मेटे साहेबांच्या स्वप्नातील शिवस्मारक अरबी समुद्रात उभारले जावे या प्रश्नावर एकाही नेत्याने पाठपुरावा केला नाही ही दुर्दैवाने वास्तवता आहे.केंद्र आणि राज्य सरकारने येणाऱ्या चार महिन्यात जर शिवस्मारक उभारणीसाठी निर्णायक आणि ठोस भूमिका घेतली नाही तर स्वर्गीय मेटे साहेबांचे अधुरे राहिलेले शिवस्मारकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जय शिवसंग्राम सह महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी नागरिक हे मेटे साहेबांच्या स्मृतिदिनापासून म्हणजे 14 ऑगस्ट 2026 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जनांदोलन छेडेल असा थेट इशारा जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे.
मोदी – फडणवीस सरकारने हलक्यात घेऊन नये..?
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याशिवाय शिवप्रेमी स्वस्थ बसणार नाहीत.शिवस्मारक हा प्रश्न केवळ विकासाचा मुद्दा नाही तर तो शिवप्रेमींच्या भावनांचा विषय आहे. या प्रश्नांना न्याय देण्याऐवजी जर केंद्र आणि राज्य सरकार राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भिजत घोंगड ठेवणार असेल तर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसह महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांना येणाऱ्या राजकीय वाटचालीमध्ये शिवप्रेमी आणि जय शिवसंग्राम जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आम्ही सर्वस्व अर्पण करू पण शिवस्मारकाचा लढा पूर्ण झाल्याशिवाय भविष्यात थांबणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा मोदी आणि फडणवीस सरकारला जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे यांनी दिला आहे.


