ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रपतींना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- राज्यभरात निर्माण झालेल्या गंभीर गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार जिवती यांचेमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. “नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर” या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

     निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गॅस टंचाईमुळे सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून रोजगार व उपजीविकेवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अकोला येथे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ यांचा गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याची घटना घडली असून अमरावती येथेही अशाच प्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

गॅसअभावी घरगुती स्वयंपाक व्यवस्था ठप्प झाली असून चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य विक्रेते व लहान व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंद पडले आहेत. अनेक नागरिकांना पर्याय म्हणून कोळसा व लाकडाचा वापर करावा लागत आहे.

     हॉटेल व्यवसायावरही याचा गंभीर परिणाम झाला असून चहा, नाश्ता व अन्य पदार्थांची विक्री घटली आहे. दरम्यान, लग्न समारंभ, धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम पुढे ढकलले जात असून वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या सुविधांवरही परिणाम झाला आहे. एलपीजी टंचाईमुळे रिक्षा भाड्यात वाढ झाली असून सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासन परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार रोखावा, २५ दिवसांची अट शिथिल करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे, अशा विविध मागण्या आघाडीने केल्या आहेत.

     यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी सोनकांबळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभाबाई वाघमारे, दिपक साबने, कल्याण सरोदे, किर्लोस गायकवाड, संभाजी ढगे, विसांबर साबने, शुद्धोधन निखाडे, लक्ष्मीबाई साळवे, धोंडूबाई जोंधळे, सुरेखाबाई कांबळे, प्रकाश मोरे, शेषीकलाबाई गायकवाड, हरिश्चंद्र सरोदे, विकास बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये