ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरातन वारसा दुर्लक्षित _ बरांज मोकासा येथील ऐतिहासिक बावडी जीर्ण अवस्थेत

शिल्पकलेचा उत्तम नमुना पुरातत्त्व विभाग व कोळसा खाणी मुळे नष्ट होण्याच्या मार्गावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती नगरी ही ऐतिहासिक नगरी असून भद्रवती तालुक्यातील बरांज मोकासा गाव परिसरात असलेली पुरातन दगडी बावडी (स्टेपवेल) सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारी ही बावडी आज गवत, झुडपे आणि मातीखाली दडपली जात आहे.

विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा प्राचीन काळापासून विविध संस्कृतींचा साक्षीदार राहिला आहे. गोंड राजवट, मराठा व ब्रिटिश काळात येथे अनेक ऐतिहासिक वास्तू उभारण्यात आल्या. बरांज मोकासा परिसरातील ही बावडी देखील त्याच काळातील असण्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

ही बावडी दगडांनी कोरलेल्या मजबूत बांधकामासाठी ओळखली जाते. आत जाण्यासाठी पायऱ्यांची विशेष रचना असून भिंतींवर धार्मिक स्वरूपातील कोरीव काम दिसून येते. विशेष म्हणजे काही ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्ती कोरलेल्या असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. पूर्वी अशा बावड्या पाण्याचा साठा, धार्मिक विधी तसेच सामाजिक उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात होत्या.

मात्र सध्या या बावडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. परिसरात गवत व झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून पाण्याचा स्रोत बंद होऊन चिखल व माती साचली आहे. दगडी भिंतींवर झीज व भगदाडे निर्माण झाली असून कोणतीही संरक्षण किंवा साफसफाईची व्यवस्था नसल्याचे चित्र दिसून येते.

दरम्यान, बरांज मोकासा हे गाव भद्रावती पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणींमुळे पर्यावरणीय बदल झाले असून त्याचा परिणाम जलस्रोत व शेतीवरही झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांकडे दुर्लक्ष वाढल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बावडीचे तातडीने संरक्षण व संवर्धन करण्याची मागणी केली आहे. तसेच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबरोबरच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांनी या वारशाची नोंद घेऊन अभ्यास करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

एकूणच, बरांज मोकासा येथील ही बावडी केवळ जलस्रोत नसून इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. भद्रावती शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी असे दुर्मिळ व तत्कालीन संस्कृती दर्शक शिल्प, विहिरी, वास्तू आहेत यांचे वेळेत संवर्धन न झाल्यास हा अमूल्य वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बरांज मोकासा येथील कोळसा खाणी व मातीचे ढिगारे हा अमूल्य ठेवा गिळंकृत करण्याची अधिक शक्यता असल्याने सबंधित ग्रामपंचायत, इतिहास अभ्यासक, संशोधक व कोळसा खान प्रशासनाने वेळीच दखल घेणे अतिशय गरजेचे आहे.

*ऐतिहासिक साक्ष देणारे शिल्प*

 एक नव्हे तर अनेक ठिकाणी ऐतिहासिक साक्ष देणारे शिल्प, पडके मंदिर, विहिरी , परकोट अक्षरशः अडगळीत पडले आहेत. बधिर व असंवेदनशील पुरातत्व विभागाचे लक्ष वेधणे याकरिता एका सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. ते टिकवून हे दुर्मिळ व तत्कालीन संस्कृती दर्शक ठेवे पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे व त्यांचे जतन करणे हे महत्वाचे आहे.

           लीमेश मानुसमारे, सामाजिक कार्यकर्ते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये