ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जंगलातील बंधाऱ्यांसाठी जंगलातीलच रेती, मुरुमाची लूट

वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : ठेकेदाराचा मनमानी प्रताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपीपरी तालुक्यातील आकसापूर व करंजी परिसरातील जंगलात बंधारे बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रेती व मुरूमची अवैध्य वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य चांदा वनविभागअंतर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील करंजी उपवन क्षेत्रात हा प्रकार सुरू असून, संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

स्थानिक नागरिक व पर्यावप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार, वनक्षेत्रातील नाल्यांमधून नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केल्या जात आहे. नैसर्गिक जलप्रवाह अडवून ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने रात्रीच नव्हे तर भर दिवसा देखील खुलेआम उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रक्रियेत खाजगी ठेकेदारांचा सहभाग असून काही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.

कायदेशीरदृष्ट्या, वनक्षेत्रातील गौण खनिज उत्खननासाठी वन (संरक्षण) अधिनियम १९८० तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कडक निर्बंध आहेत. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या रेती उपसा करण्यासाठी संबंधित पर्यावरणीय मंजुरी व खनिज विभागाची अधिकृत परवानगी आवश्यक असते. मात्र, या प्रकारच्या कोणत्याही वैद्य प्रक्रियेचे पालन होत नसल्याचे दिसून येते. या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाल्यांचे नैसर्गिक जलप्रवाह खंडीत झाल्याने जलस्रोत आटत असून, वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने भूजल पातळी घटण्याचा धोका वाढला आहे. परिणामी, जंगलातील जैवविविधतांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो.

नियमांनुसार वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास सक्त मनाई असताना, हा प्रकार दीर्घकाळ सुरु राहणे ही प्रशासनाच्या निष्कियत्रेची निशाणी मानली जात आहे. महसूल व वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच अवैध्य रेती उपसा तत्काळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

*सिंचाई बंधारा बांधकामात घोळ*

गोंडपिपरी सिंचाई उपविभागाच्या देखरेखीखाली करंजी ग्रामपंचायत हद्दीतील दुबागुडा जंगल परिसरात बंधारा बांधकामात मोठा घोळ झाला आहे. बंधारा बांधकामात रेती व मुरूम वनविभागाच्या हद्दीतून बेकायदेशीररीत्या उपसा करून वापरण्यात आली. बंधारा पायाभरणीत निकृष्ट दर्जाचे काँक्रिट वापरण्यात आले असून त्यात मोठ्या प्रमाणात माती मिसळली आहे. कामामध्ये लोखंड सलाखींचा योग्य प्रमाणात वापर करण्यात आला नसून जुनाट साहित्याला रंगवून नवीन मालाचा भास निर्माण करण्यात आला.

पाईप व लोखंडी प्लेट देखील रंगवून लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर, कामसंबधीचे फोटो हे इतर ठिकाणचे दाखवून बिल उचलण्याचा ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात महसूल विभाग, सिंचाई उपविभाग आणि वनविभागाचे संपूर्णतः दुर्लक्ष होत असून, या बंधारा बांधकामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये