“तुम्ही माहिती द्या, आम्ही कारवाई करतो..!”
चंद्रपूर प्रशासनाचा अजब कारभार _ माफिया आणि अधिकाऱ्यांचे 'मॅच फिक्सिंग'?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
“तुम्ही माहिती द्या, आम्ही कारवाई करतो,” असे गोंडस आश्वासन देणारे चंद्रपूरचे प्रशासन सध्या माफियांच्या तालावर नाचत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. रेती, मुरूम आणि अवैध दारू तस्करांनी जिल्ह्याला विळखा घातला असताना, तक्रारदारांची माहिती थेट तस्करांपर्यंत पोहोचवून त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्याचे ‘पाप’ प्रशासनातील काही सुभेदार करत असल्याची खळबळजनक चर्चा आता जनमानसात सुरू झाली आहे
*तक्रारदार टार्गेटवर; प्रशासनाचा ‘डबल गेम* ‘
जिल्ह्यात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. वृत्तपत्रांमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही ढिम्म प्रशासन हलत नाही. जेव्हा एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा प्रतिष्ठित नागरिक हिंमत दाखवून तक्रार करतो, तेव्हा “आम्ही कारवाई करू” असे सांगणारे प्रशासन, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याऐवजी तातडीने संबंधित माफियांना फोन करून ‘टीप’ देते. “अमुक व्यक्तीने तुमची तक्रार केली आहे, आता सांभाळून राहा,” असा निरोप दिल्यानंतर तस्कर सावध होतात आणि तक्रारदाराला धमकावण्याचे सत्र सुरू होते.
*तस्करांची ‘पॉवर’ प्रशासनापेक्षा मोठी…?*
तस्करांनी प्रशासनाला हाताशी धरून ‘काम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर सुरू केला आहे. अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना फोनवर धमकावणे, त्यांच्यावर हल्ले करणे किंवा खोट्या प्रकरणांत अडकवण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रशासनाचे आणि तस्करांचे ‘साटेलोटे’ इतके घट्ट आहे की, खबर मिळताच कारवाई होण्याऐवजी ‘व्यवहार’ पूर्ण केला जातो.
*गुप्त मनोमिलन कार्यक्रम*
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मोठे माफिया आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्यात दर महिन्याला ‘मनोमिलन’ पार पडते. या गुप्त बैठकीतच पुढील महिन्यातील तस्करीचे मार्ग आणि कारवाई टाळण्याचे सल्ले दिले जातात. प्रशासनाचेच आशीर्वाद पाठीशी असल्याने तस्करांना कायद्याची भीती उरलेली नाही. एका बाजूला सर्वसामान्य जनता महागाई आणि नियमांच्या कचाट्यात अडकली आहे, तर दुसऱ्या बाजूला माफिया राजरोसपणे नैसर्गिक संपत्तीची लूट करत आहेत.
*बिहार व्हायला वेळ लागणार नाही*
जर हीच परिस्थिती राहिली, तर चंद्रपूर जिल्ह्याचा ‘बिहार’ व्हायला वेळ लागणार नाही. गुंडगिरी आणि तस्करीचे जाळे इतके मजबूत झाले आहे की, उद्या प्रशासनालाही हे तस्कर जुमानणार नाहीत. जनतेमध्ये आता भीतीचे वातावरण असून, प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. “आम्ही खबर द्यायची आणि तस्करांच्या गोळ्या खायच्या का?” असा संतप्त सवाल जनता विचारत आहे.
*आश्वासनांचे गाजर, कारवाई शून्य*
प्रशासनाने जर वेळीच या तस्करांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर भविष्यात चंद्रपुरात कायद्याचे राज्य संपून ‘जंगलराज’ सुरू होईल. केवळ आश्वासनांचे गाजर न दाखवता, प्रत्यक्ष जमिनीवर कारवाई करून तस्करांचे कंबरडे मोडण्याची गरज आहे. अन्यथा, या भ्रष्ट मनोमिलनात जिल्ह्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही.
जिल्ह्याच्या ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन, तस्करांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



