‘रॉयल्टी’च्या नावाखाली गौण खनिजाची उघड लूट
तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील वेंकटपूर शिवारासह परिसरात सध्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननाचा आणि वाहतुकीचा मोठा गोरखधंदा उघडकीस आला आहे. शंभर ब्रासच्या रॉयल्टीवर तब्बल पाचपट अवैध उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा खळबळजनक प्रकार “लोकशाही वार्ता” ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकर यांनी चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंकटपूर शिवारातील सर्व्हे क्रमांक १६२ मधून मुरुम उपसा करण्यासाठी भालचंद्र बोधलकर नावाच्या व्यक्तीने १०० ब्रास मुरुमाची तांत्रिक रॉयल्टी काढली होती. मात्र, ही रॉयल्टी काढताना ‘टाईम मॅनेजमेंट’चा एक मोठा तांत्रिक खेळ खेळण्यात आला. नियमानुसार, लांबच्या अंतरासाठी रॉयल्टीवर साधारणतः दोन तासांचा अवधी मिळतो. याच नियमाचा गैरफायदा घेत, तोहगाव आणि लाठी या दूरच्या गावांच्या नावावर ही रॉयल्टी दाखवण्यात आली.
वास्तवात, तोहगावच्या नावे मिळालेल्या दोन तासांच्या वाढीव वेळेत, अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोंडपिंपरी शहरात आणि चंद्रपूर मार्गावरील चिंतामणी कॉलेज जवळील ले-आउटवर एकाच रॉयल्टी पासवर ५ ते ६ फेऱ्या मारण्यात आल्या. कागदोपत्री केवळ १०० ब्रासची नोंद असताना, प्रत्यक्षात ५०० ते ६०० ब्रास मुरुम उपसा करून तो शहरात आणि चिंतामणी कॉलेज जवळली लेआऊट परिसरात टाकण्यात आला.
दिवसाढवळ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने हा प्रकार सुरू असताना स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुरुम तस्करांनी महसूल विभागाच्या नाकाखाली हा ‘टाईम गेम’ खेळून निसर्गाची आणि शासनाच्या तिजोरीची लूट केली आहे. “प्रशासन केवळ सामान्यांवर दंड आकारते, मग अशा मोठ्या माफियांवर मेहेरबान का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
*तहसीलदारांचे आश्वासक पाऊल*
या प्रकरणाची दखल घेत तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणाहून मुरुम काढला गेला, त्या गड्ड्यांचे मोजमाप केल्यास नेमका किती उपसा झाला हे स्पष्ट होईल. तसेच संबंधित ले-आउटवर टाकण्यात आलेल्या मुरुमाची ‘ट्रांझिट पास’ (TP) तपासली जाणार आहे.
आता या चौकशीतून सत्य बाहेर येते की नेहमीप्रमाणे कागदोपत्री घोडे नाचवून दोषींना अभय दिले जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. “दोषी आढळणाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन प्रशासनाकडून दैनिक लोकशाही वार्ताला देण्यात आले आहे.



