सामाजिक बांधिलकी जपणारे गौतम झाडे यांचे दुःखद निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक हसतमुख, जिव्हाळ्याचा आणि जनतेसाठी कायम धावणारा चेहरा आज हरपला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका गोंडपिपरी (अनु. जाती सेल) चे तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत चेकबोरगावचे माजी उपसरपंच गौतम झाडे (वय ५५ वर्षे) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कालपर्यंत लोकांच्या प्रश्नांसाठी धावपळ करणारा, प्रत्येकाच्या अडचणींना स्वतःच्या समजून लढणारा माणूस आज कायमचा निघून गेला, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.
वयाच्या ५५ व्या वर्षीही गौतम झाडे हे सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होते. सामान्य जनतेचे प्रश्न, अन्याय, स्थानिक समस्या यावर ते ठामपणे आवाज उठवत असत. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे समाजाप्रती असलेली तळमळ आणि लोकांविषयीचा जिव्हाळा दिसून येत होता. त्यामुळेच ते फक्त नेता नव्हते, तर “आपला माणूस” म्हणून सर्वांच्या मनात घर करून होते.
ग्रामपंचायत चेकबोरगावचे माजी उपसरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले. गावातील रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कामामुळे अनेकांना दिलासा मिळाला, अनेकांना आधार मिळाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पक्ष व कार्यकर्त्यांमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक प्रामाणिक कार्यकर्ता, संवेदनशील नेता आणि माणुसकी जपणारा व्यक्ती हरपला आहे.



