कोंडय्या महाराज देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
संतनगरीत धाबात दीपोत्सव साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
विदर्भासह शेजारील तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा येथील संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थाला राज्य शासनाने अखेर ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा मानाचा दर्जा बहाल केला आहे. यामुळे धाबा नगरीच्या विकासाला नवी गती मिळणार असून, भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’ ब ‘ दर्जा मिळाल्याची माहिती मिळताच गावात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
जिल्हातील महत्वाचे श्रद्धास्थान असलेले श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला राज्य शासनाने ब दर्जा बहाल केला. ग्रामविकास विभागाने २७ मार्च २०२६ रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करत, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना’ अंतर्गत यापूर्वी ‘क’ वर्गात समाविष्ट असलेल्या या देवस्थानाची श्रेणी वाढवून ‘ब’ वर्गात समाविष्ट केली आहे. या निर्णयामुळे देवस्थानाच्या विकासासाठी शासनाकडून अधिक निधी उपलब्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे आमदार देवराव भोंगळे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न निर्णायक ठरले. त्यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि पत्रव्यवहार करून या मागणीला जोरकसपणे मांडले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, संपूर्ण धाबा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*ऐतिहासिक गाव संतनगरी धाबा*
धाबा हे ऐतिहासिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. येथे संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे जागृत देवस्थान असून, दरवर्षी येथे सहा दिवसांची भव्य यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. मात्र, वाढत्या भाविकसंख्येच्या तुलनेत आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत होत्या. आता ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी भक्तनिवास, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुसज्ज रस्ते, स्वच्छता व्यवस्था, प्रकाशयोजना, पार्किंग यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. यामुळे भाविकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरणात दर्शन घेता येणार आहे.
*संतनगरीत दीपोत्सव साजरा*
गावातील अनेक घरात दीप लावण्यात आले. मुख्य मार्ग दीपांच्या उजेडात उजळून निघाले होते. संस्थेचे कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, पारसनाथ अलोणे, मनोज कोप्पावार, अशोक झाडे, प्रवीण मेश्राम, केलीचंद झाडे, गजानन बंडावार, रमेश ठुसे, सुभाष मोहुर्ले, सूर्यकांत मुंजेकर, सुरज भस्की, शालिनी सांगडे, कविता चणेकार, दीपा संदोकार, उषा चंदनगिरीवार, माया ठुसे, मालनबाई बंडू बोरकुटे, मैनाबाई संदोकार उपस्थित होते.
*गाव विकासाला चालना*
या निर्णयामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यात्रेदरम्यान स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि लघुउद्योगांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही धाबा नगरीचा विकास होण्याची शक्यता आहे.
या यशस्वी निर्णयानंतर धाबा परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि विविध सामाजिक संघटनांकडून आमदार देवराव भोंगळे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, “धाबा तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा” अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



