आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ९५९७ घरकुलांसाठी ३५ कोटींची मंजुरी
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा

चांदा ब्लास्ट
गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत केलेला पाठपुरावा फलदायी
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसरकारचे आभार.
चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या घरकुलाच्या प्रश्नाला ठामपणे वाचा फोडली. त्यांच्या या प्रभावी पाठपुराव्याला यश मिळत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ९५९७ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरजू नागरिकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक निवारा उपलब्ध करून देणारा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार अत्यंत दिलासादायक व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या मंजुरीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यांनी वारंवार पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष संवाद साधत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्यास शासनाला भाग पाडले.विशेष म्हणजे, या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करत गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी ठाम आणि आग्रही भूमिका मांडली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील ९५९७ कुटुंबांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण झाला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ९५९७ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या घरकुलांसाठी तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २७ मार्च रोजी निर्गमित करून ३५ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि स्थिर निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असून, या योजनेमुळे हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. या निर्णयामुळे केवळ घरकुलांची उभारणीच नव्हे, तर गरिबांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, जिल्ह्यातील ९५९७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्यसरकारचे आभार व्यक्त केले आहे.
घरकुलासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी
नवीन चंद्रपूर (म्हाडा कॉलनी) परिसरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे २३० कोटी रुपयांच्या २००४ घरांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सोबतच यापूर्वी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ९५९७ घरकुलांसाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. आणि आता पुन्हा ९५९७ घरकुलांसाठी ३५ कोटी रुपये राज्यसरकार कडून मंजूर करत जिल्ह्यातील घरकुल लाभाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.



