रामनवमी निमित्त सार्वजनिक बाल शारदोस्तव मंडळाचा अनोखा उपक्रम.
४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मिरवणुकीच्या मार्गाची स्वच्छता व पुष्पवर्षाव.
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त सार्वजनिक बाल शारदोस्तव मंडळाच्या वतीने भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश देणारा एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सकाळी श्री काळाराम मंदिर, येथे भाविकांसाठी थंडगार लस्सी व स्वादिष्ट सोनपापडीचे वाटप करण्यात आले. या प्रसादाचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावरील रस्ता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः झाडून स्वच्छ केला तसेच रस्त्यावर पुष्पवर्षाव करून प्रभू श्रीरामांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
या उपक्रमातून स्वच्छता, सेवा आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. मंडळाच्या या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आणि संपूर्ण परिसर “जय श्री राम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
सार्वजनिक बाल शारदोस्तव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या या स्तुत्य आणि समाजप्रेरणादायी कार्याचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



