शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक श्रवण दिन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील कान-नाक-घसा विभागामार्फत जागतिक श्रवण दिन जनजागृतीपर उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उपअधिष्ठाता डॉ. सुरपम उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जागतिक श्रवण दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी, लहान वयात श्रवणदोषाचे निदान व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले.
विभागप्रमुख डॉ. विपिन ईखार यांनी, बालकांमधील श्रवणदोषाचे लवकर निदान, नवजात श्रवण तपासणी व वेळेवर उपचार यांचे महत्त्व सांगितले. तसेच श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी युनिव्हर्सल स्क्रिनिंग कार्यक्रम, कॉक्लिअर इम्प्लांट कार्यक्रमही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोणालाही ऐकण्यासंबंधी कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित विभागात येऊन तपासणी करून घ्यावी व उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ईएनटी विभागाने केले आहे. विभागाच्या वतीने तृतीय वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिवानी ढवस यांनी तर आभार सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुणाल कापर्तीवार यांनी मानले. यावेळी समाजसेवा अधीक्षक उमेश आडे, डॉ. आयुषी गुप्ता, डॉ. अनुजा कोटकर, डॉ. आसावरी देवतळे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. अंकिता आडसुळ, डॉ. क्षितिजा पाल्हाडे आणि ईएनटी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बिलवणे यांच्यासह सर्व प्राध्यापक, निवासी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.



