ट्रॅक्टर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक; ₹२.७५ लाखांचा फटका
२३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील येल्लापूर येथील शेतकरी भास्कर नागनाथ सोनकांबळे यांची ट्रॅक्टर खरेदी प्रकरणात गंभीर फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून त्यांना तब्बल ₹२ लाख ७५ हजारांचा आर्थिक फटका बसला आहे. न्याय मिळत नसल्याने त्यांनी २३ मार्चपासून तहसील कार्यालय, जिवती येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोनकांबळे यांना ट्रॅक्टर मंजूर झाला होता. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर येथील ट्रॅक्टर कंपनीकडे ₹ १ लाख ५० हजारांची डाउन पेमेंट रक्कम भरली. मात्र संबंधित कंपनीने फायनान्स प्रक्रिया पूर्ण न करता ट्रॅक्टर परत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे भरलेली रक्कम परत देण्यास कंपनीने नकार दिल्याचे सोनकांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना ट्रॅक्टर गमवावा लागला असून, योजनेअंतर्गत मिळणारे ₹ १ लाख २५ हजारांचे अनुदानही कालमर्यादा संपल्याने हुकले आहे. परिणामी त्यांचे एकूण ₹ २.७५ लाखांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सोनकांबळे यांनी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून संबंधित एजंट व कंपनी व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा ग्राहक निवारण आयोग यांच्याकडेही त्यांनी निवेदन सादर केले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, उपोषणादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास संबंधित कंपनी जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी व पीडित शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.



