महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तब्बल वीस दिवसांपासून विठ्ठलवाडावासीय अंधारात..!
लाईनमनची नियुक्ती असूनही वीजपुरवठा ठप्प ; तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
*गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा येथे गेल्या तब्बल वीस दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले असून महावितरणाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.*
महावितरणला दिलेल्या निवेदनानुसार, विठ्ठलवाडा येथे लाईनमनची नियुक्ती करण्यात आली असली तरी गेल्या वीस दिवसांपासून गावातील विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आणि देखभाल नियमितपणे होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी गावातील अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून काही ठिकाणी अनेक दिवस वीजच उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे. रात्री अभ्यास करणे अशक्य झाले असून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मोटारपंप बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकरी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. शेतीपंपांना वीज मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांच्या मते, संबंधित लाईनमनकडून विद्युत वाहिन्यांची नियमित देखभाल होत नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित प्रकाराची चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करावी तसेच विठ्ठलवाडा गावाचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
*वीज ही काळाची गरज*
वीज ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा असून तिच्या अभावामुळे शिक्षण, शेती, पाणीपुरवठा आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन विठ्ठलवाडा ग्रामस्थांना अंधारातून दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


